Marathi Language Literature - Madhurarani CH-30 लर्फवर्फकर्फर येर्फे ...

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Language Literature - Madhurarani CH-30 लर्फवर्फकर्फर येर्फे ...

गणेश मधुराणीच्या दुकानावर आला तेव्हा दुकानावर बरीच गर्दी होती. कालच्या मिटींगपासून गणेशच्या मनात बरच काही धुमसत होतं. ते तिच्याजवळ बोलून मन हलकं करावं असं गणेशला वाटत होतं. पण लोकांची गर्दी पाहता ते बोलणं शक्य नव्हतं. गणेशनं गर्दीतून डोकावून मधुराणीकडे बघितले. तिने त्याच्याकडे एक दृष्टीकटाक्ष देत एक विशिष्ट अविर्भाव करीत मधुर स्मित केले.

प्लीज मला समजून घे... हे लोक गेल्याशिवाय कशीकाय मी तुझ्याकडे लक्ष देऊ शकेन' हाच अर्थ असावा तिच्या अविर्भावाचा...

नक्कीच...

गणेश न राहवून तिच्या दुकानासमोर मागे पुढे अशा चकरा मारायला लागला. दोनतीन चकरा मारल्यानंतर त्याने विचार केला.

इथे थांबून असे चकरा मारने बरे दिसणार नाही...

कोणी अर्थाचा अनर्थ काढेल....

त्याने गर्दीतून मधुराणीकडे पाहून हातानेच गोल फिरवून 'नंतर येतो' असे खुणावले. तिनेही त्याला डोळ्यानेच संम्मती दिली.

तो तिथून परत आपल्या खोलीवर निघाला. जातांना त्याला मधुराणीचा आवाज आला, " लर्फवर्फकर्फर येर्फे ... मीर्फी वार्फटर्फ पार्फाहीर्फीनर्फ".

तो एकदम ब्रेक लागल्यागत थांबला.

अरे ही तर मधुराणीची कोड भाषा आहे...

काय म्हणाली तॊ?...

अं... हं... त्यातले र्फ, र्फा, र्फे काढून टाकायचे...

तो मनातल्या मनात तिने उच्चारलेल्या वाक्यावर र्फ, र्फा, र्फे काढून टाकण्याची प्रक्रिया करु लागला.

काय उरते...

... ल... व...क...र... ये ... मी ... वा... ट... पा...ही..ऩ

हं ... लवकर ये मी वाट पाहीन...

अरे म्हणजे ती आपल्यालाच हे म्हणत होती...

पण ती अशा तऱ्हेने बोलली की दुकानातल्याच कुणाला तरी बोलली असावी...

गणेशने वळून तिच्याकडे पाहिले. ती त्याच्याकडेच पाहून गालातल्या गालात हसत होती. तेच आर्त डोळे आणि तीच घायाळ करणारी मादक नजर. तिची नजर त्याला एका प्रेमीकेची आपल्या प्रियकराला साद घालणारी नजर वाटत होती. गणेशही तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसला आणि परत आपल्या खोलीकडे निघाला.

जाता जाता त्याच्या समोरुन त्याला मुकी टमरेल घेऊन गोदरीवर जातांना दिसली. त्याने इकडे तिकडे वळून बघितले. मुका कुठेही दिसत नव्हता. पण लोकांच्या कुत्सित नजरा त्याला तिच्याकडे पाहतांना दिसल्या. त्याला कुणीतरी सांगितले होते की आजकाल मुक्याला एका खोलीत डांबून त्याच्यावर कडा पहारा ठेवण्यात येतो आहे म्हणून. मुकीचाही चेहरा निस्तेज वाटत होता. जड पावलाने तो आपल्या खोलीत परतला.

दारावरच्या पडलेल्या थापेने गणेश दचकून उठला.

कोण असेल...

मघाशी मधुराणीच्या दुकानावरून येऊन तो विचार करीत गादीवर पडला होता. केव्हा डोळा लागला त्याला काही कळलेच नव्हते. त्याने उठून खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. पूर्णपणे अंधारून आले होते. त्याची नजर मधुराणीच्या दुकानाकडे गेली. दुकानात आता कुणीच गिऱ्हाईक नव्हते. पण दुकानाचा गल्ला रिकामाच होता. तिथे मधुराणी नव्हती.

मधुराणीनेच तर दारावर थाप दिली नसेल....

असा विचार करून तो ताडकन उठून उभा राहिला. दाराजवळ जाऊन त्याने दार उघडले आणि त्याने समोर हसून पाहले. पण समोर मधुराणी नव्हती. सारजाबाई होती.

मग मधुराणी असा गल्ला रिकामा सोडून कुठे गेली असावी?....

सारजाबाईने त्याचे संध्याकाळचे जेवण एका ताटात पदराने झाकून आणले होते. कुणाकडे जेवायचे नसल्यास त्याच्या जेवणाची जबाबदारी सारजाबाईकडे होती. तशी त्या बदल्यात ती त्याच्याकडून काही मागत नसे. प्रथम त्याने तिला त्याबदल्यात अधूनमधून पैसे देण्याचा प्रयत्न केला होता. पण ती पैसे घेत नसे. पण त्याला असे फुकट तिच्याकडून जेवणे चांगले वाटत नव्हते. तशी तीची परिस्थितीही बेताचीच होती. मग त्याने एक मधला मार्ग काढला होता. अधून मधून महिन्याचा किराणा तो तिच्याइथे भरत असे. कधी तालूक्याच्या ठिकाणावरून तिला पातळ वैगेरे आणत असे.

नेहमीप्रमाणे काही न बोलता सरावाने सारजाबाईने ताट आत आणून झाकून ठेवले आणि सकाळचे खरकटे ताट उचलून नेले.

गणेश बाहेर येऊन इकडे तिकडे मधुराणीला शोधू लागला. गल्लीत एका कोपऱ्यात बाजूला अंधारात मधुराणी त्याला एका लूगड्यावाल्या बाईशी काहीतरी बोलत असतांना दिसली. त्यांची हलक्या आवाजात काहीतरी खुसरफुसुर चालली होती. लूगड्यावाल्या बाईच्या हातात रिकामे टमरेल होते. म्हणजे गोदरीतून परतल्यानंतरच्या तिच्या मोकळ्या गप्पा चाललेल्या होत्या. गणेशचं तिकडं लक्ष जाताच आणि त्या लूगड्यावाल्या बाईची त्याच्याशी नजरानजर होताच ती आटोपतं घेत जरा जोराने त्याला ऐकू येईल अशा आवाजात म्हणाली. " आता तेला तालूक्याच्या ठिकाणच्या डाक्तराकडं नेवू मनला धनी ... "

अन् तिनं तिथून काढता पाय घेतला.

"थीकडून आल्यावर मंग सांगतो बाकीचं" ती जाता जाता म्हणाली.

ती जाताच मधुराणीने गणेशकडे पाहिले आणि ती आपल्या दुकानाकडे जात म्हणाली " मघाशी आले होते?"

गणेशने मागे वळून आपल्या खोलीच्या दाराला ओढून कडी घातली आणि तोही तिच्या दुकानाकडे निघाला.

क्रमश:...

Marathi language literature, Marathi code language, Maratathi Entertainment, Marathi world, Marathi on net, Marathi .pdf .rar books, Marathi rapidshare

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network