Marathi Books Library - Madhurani CH 31काय डेंजर लोक आहेत ...

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Books Library - Madhurani CH 31काय डेंजर लोक आहेत ...

" काय डेंजर लोक आहेत तुमच्या गावातली ... चांगली चाललेली बैठक फिसकटवली त्यांनी " गणेश मधुराणीला म्हणाला.

" लग्नाच्या बैठकीचं आसंच आसतं ... कोण कुठं फांजी मारल आन कशी बैठक फिसकटून टाकल काही सांगता येत नाय " मधुराणीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

" तू काहीही म्हण ... मला तर यात पाटलाचीच चाल दिसते... "

" कशी काय?"

" सरपंचानं जुळवलं होतं नं ते सगळं ... ते त्याला पाहवलं गेलं नाही असं मला वाटतं"

" छा.. छा ... तसा नाय करायचा पाटील... त्यो तसा चांगला माणूस हाय ... तसं आसतं तर त्यानं मिटींगच भरवली नसती.... अन् मिटींगबी त्यानं त्याच्या घरी नसती घेतली..." मधुराणी म्हणाली.

गणेश मनातल्या मनात विचार करु लागला.

ही पाटलाबद्दल एवढं चांगलं कशी बोलू शकते...

त्या पाटलाच्या जिपनेच तर इच्या नवऱ्याला धडक मारली होती...

अन् त्यात तो मेला होता...

तसं पाहिलं तर तिने आज पाटलांनी मिटींगला बोलावल्याचं निमंत्रण देखील स्वीकारायला नको होतं...

पण तो विषय आता आपण इथे काढावा का?...

नाही आता नको पुन्हा कधीतरी...

पण वरकरणी काहीही न दाखवीता तो म्हणाला, " यालाच तर पॉलीटीक्स म्हणतात ... "

" पॉलीटीक्स बिलीटीक्स आपल्याला नाय बा कळतं... तरीबी पाटील तसं काही करणार आसं नाय वाटत ... आपल्याला माणसं ओळखण्याची नजर हाय... तुमाला नाय ओळखली का मी ... '' गणेशच्या डोळ्यात आपले खोडकर डोळे टाकत ती म्हणाली.

" बायांची जात भोळी असते ... त्यांना नाही कळत हे असं ...मी स्वत:च्या डोळ्यानं पाटलाला त्या डॉक्टरला खुणावतांना पाहलं " गणेश तिची खोडकर नजर टाळत म्हणाला.

" जाऊद्या गणेश ... काय त्याचं घेऊन बसला" मधुराणी गल्ल्यावरच्या गल्ल्यावर गणेशकडे सरकत म्हणाली.

" पण कुणीतरी बोलायला पाहिजे होतं... हे एवढं चूक होत आहे ... आता बिचाऱ्या त्या मुकीचं काय होणार... बाईच्या जातीवर अन्याय होत आहे हे दिसत असतांना तू तरी काहीतरी बोलायला पाहिजे होतं... तुही अशी गप बसशील असं वाटलं नव्हतं मला" गणेश आवेशाच्या भरात बोलला.

आता मात्र मधुराणीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून ती एकदम गंभीर झाली.

गणेशला वाटून गेले की उगीचच आपण असे बोललो. काय बोललो त्यावर एकदा विचार करून चाचपडून बघितले.

.. पण आपण काय चूकीचं बोललो?...

" गणेशराव ..." गणेशवरून आता मधुराणी तिऱ्हाईतासारखी 'गणेशराव' या संबोधनावर आली.

" या दुनियेत बऱ्याच अशा गोष्टी हायेत की ज्या योग्य असतात ... पण होत नायत... हा सगळा नशिबाचा खेळ असतो... त्यात आपण बोलून न बोलून काही उपयोग नसतो... आता तुमी बोललेच की ... झाला काही बोलून उपयोग ... चारचौघात अपमान झाला तो वेगळाच... मी बोलले आसते तरी तेच झालं आसतं... बाईच्या जातीनं माणसात बोलायचं काम नाय म्हणून कोणीतरी गप केलं आसतं मला..." आता मधुराणी आवेशात बोलू लागली.

" नाही तसं नाही ..." गणेश बोलण्याचा प्रयत्न करून तिला शांत करण्याचा प्रयत्न करु लागला.

गणेशचं वाक्य मधेच अर्ध्यावर तोडत मधुराणी पुढे म्हणाली,

" तुमाला वाटते की त्यांचं लगीन झालं आसतं तर बरं झालं आसतं... तुमच्या वाटण्याला काय अर्थ हाय... आता समजा मला वाटते की तुमचं अन् माझं लगीन झालं तर किती बरं होईल... "

गणेश एकदम धक्का लागल्यागत गंभीर होऊन तिच्याकडे बघायला लागला.

" पण तुमच्या माझ्या वाटण्याला काही अर्थ हाय? ... ह्या सगळ्या नशिबाच्या गोष्टी ..."

इचा आपल्याशी लग्न करण्याचा विचार तर नाही ना ...

गणेश विचार करु लागला.

आपलं पहिलं लग्न मोडून आपल्याशी लग्न करण्याचा तर बेत नाहीना इचा...

चांगली भयानक बाई दिसते ...

आपल्याला हळू हळू तिच्या जाळ्यात तर ओढत नाही ना ही...

" तुमी तर लई सिरीयस झाला..." मधुराणीच्या बोलण्याने तो विचारातून जागा झाला.

" काळजी नगा करु ... तुमच्या कडून माझी काई जास्त अपेक्षा नाय ... लग्नाची तर नक्कीच नाय... एक कुटुंब उध्वस्त करून दुसरी उभी करणारी बाई वाटते मी .. व्हय?"

" नाही तसं नाही ..." गणेश फिका फिका हसत म्हणाला.

"गणेशराव... तुमी लई सिरियस होता राव" मधुराणी त्याची टाळी घेत म्हणाली.

म्हणजे इची अपेक्षा तरी काय आहे मग...

खरचं खेड्यात राहून किती मुक्त, स्वच्छंद आणि पुढारलेल्या विचाराची बाई आहे ही ...

" अन् तुमाला हेबी वाटत आसल की ह्या बाईच्या नवऱ्याला त्या पाटलाच्या गाडीनं उडीवलं अन् ही बाई त्याच्या घरी मिटींगला जाते काय अन् त्याची बाजू घेऊन कशी बोलते काय?.... " मधुराणी पुन्हा आवेशाने बोलत होती.

गणेशने एकदम तिच्याकडे चमकून बघितले.

अरे बापरे...

हीला आपल्या मनातले विचार कसे काय माहित झाले...

काय मनकवडी बाई आहे...

नाही ... आपण मनात आणण्याची आणि तिने बोलण्याची एकच वेळ झाली असेल..

केवळ योगायोग असावा...

" आता मला सांगा माहा नवरा दारु पिदाडून त्याच्या जिपसमोर गेला होता... त्यो नव्हता आला जिप घेऊन याच्या अंगावर... आता त्यात कोणाचा दोष... अन् त्या पाटलाशी वैर घेऊन काय मिळणार हाय... ते मासोळीनं पाण्यासोबत वैर घेतल्यासारखं होणार की नाय?..." मधुराणी पुढे म्हणाली.

गणेश काही न बोलता तिच्याकडे नुसता बघत होता.

नाही इचं वागणं अगदी व्यवहाराला धरुन आहे...

पाटलाशी वैर करून इच्यासारख्या एकट्या बाईचा या गावात टिकाव लागणं कठीण आहे...

गणेश जरी तिच्याकडे पाहत होता तरी तो आपल्या विचारात गढून गेलेला होता.

" काय गणेशराव ... मधे मधे ... तुमी कुठ विचारात निघून जाता बॉ" यावेळी मधुराणीने गणेशच्या दंडाला धरुन गदगद हलविले. तिच्या त्या नाजूक हाताच्या स्पर्शाने गणेशचे रोमांच उभे राहाले. गणेश पुन्हा विचारांच्या विश्वात गेला..

मधुराणी...

मला हळू हळू आता तुझं मन समजू लागलं आहे...

आणि कदाचित तुलाही आता माझं मन हळू हळू समजू लागलेलं आहे...

गणेश तिच्याकडे पाहत तिला नजरेने जसा पिवून घेत होता.

क्रमश:....

Marathi sahitya vishva, Marathi web site blog portal, sanketsthal,Useful Marathi feeds, Marathi feeds in XML form, Marathi web 3.0, Marathi ajax, Marathi OS, Marathi computers

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network