Marathi Novel - Madhurani CH-32 चोरी

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi Novel - Madhurani CH-32 चोरी

आज गुरुवार बाजाराचा दिवस. गणेश सकाळीच ऑफिसमध्ये जाऊन आला. तिथे आज काही विशेष काम नव्हतं. कंटाळून शेवटी त्याने बाजारात एक चक्कर मारली. भाजीपाल्यावाल्यांच्या समोरुन एक चक्कर मारली. सारजाबाईचं घरचंच माळवं असल्यामुळे भाजी घेण्याचा काही प्रश्नच नव्हता. मग कपड्यावाल्यांच्या इकडून एक चक्कर मारली. कपड्यावालाच्या पालात मस्त छोटे छोटे लहान मुलांच्या कपड्यापासून मोठ्या माणसांचे धोतर बायांचे लूगडे साड्या वगैरे ठेवलेले होते. त्या कपड्यात बंजारी लोकांचा लेंगा आणि वरचा टॉप असा विशेष पेहराव सुध्दा होता. तो पेहराव पाहून गणेशला उगीचच गम्मत वाटत होती. आता दुपारची धंद्याची वेळ होती त्यामुळे सगळीकडे खेड्यापाड्यातून आलेल्या गिऱ्हाईकांची झुम्बड पडली होती. रस्त्याच्या दुतर्फा दुकानावर गर्दी तर होतीच पण रस्त्यावरसुध्दा पुराचा लोंढा वाहावा तसा लोकांचा लोंढा चालत होता. गणेश गर्दीतून रस्ता काढत समोर चालला होता. गणेशला अक्षरश: बोअर होत होतं.

...चला एकदा गावात मधुराणीच्या दुकानाकडे जाऊन येऊ या...

त्याचे पाय आपसूकच मधुराणीच्या दुकानाकडे वळले. बाजाराच्या गर्दीतून बाहेर येऊन तो पाण्याच्या टाकीकडे चालायला लागला. पाण्याच्या टाकीजवळच्या पारावर वडाच्या सावलीत त्याला दोन मिनीट थांबण्याची इच्छा झाली.

.. पण नाही नको प्रथम मधुराणीच्या दुकानावरच गेलं पाहीजे...

मग तो चावडीकडे वळला आणि चावडीच्या जवळच मधुराणीचं दुकान आणि त्याची खोली होती. दुरुनच मधुराणीच्या दुकानावरची प्रचंड गर्दी पाहून तो हिरमुसला.

एवढ्या गर्दीत मधुराणीशी बोलणं शक्यच नाही ...

मग दोन मिनिट तो जागच्या जागीच घुटमळला.

परत बाजारात जावं की खोलीवर जाऊन थोडं अंग टाकावं...

चला इथवर आलोच आहो तर मधुराणीची एक झलक तरी पाहून जावं ...

तो मधुराणीच्या दुकानाकडे चालू लागला. दुकानावरच्या गर्दीतून रस्ता काढत कसातरी तो मधुराणीच्या गल्ल्याजवळ पोहोचला.

" ए शाम्या बग त्या बाईनं गुळ लेंग्यात टाकला ... जा .. जा पकड तिला... हे भिकारचोट खेड्यावरचे लोक इथं येऊन चोऱ्या करतात... " मधुराणीच्या चलाख नजरेने एका बाईने गुळ चोरलेला हेरला होता.

'' अरे जा लवकर ... धर तिला" मधुराणी ओरडली.

मधुराणीच्या दुकानावरच्या नोकराने गर्दीत इकडेतिकडे बघून एका काढता पाय घेणाऱ्या बाईला हेरले. त्या नोकराची आणि त्या बाईची नजरा नजर होताच ती झपाझप पावले टाकीत बाजाराच्या दिशेने चालायला लागली. गणेश मधुराणीच्या जवळ उभा राहून तो सगळा प्रकार बघायला लागला. मधुराणीचे त्याच्याकडे बिलकुल लक्ष नव्हते.

" ए बाई मले ... तेल दे " गर्दीतून कुणीतरी तेलाची शीशी समोर मधुराणीच्या पुढ्यात धरीत म्हटले.

" मले ... एक किलो मीठ दे" एक बाई मीठ घेण्यासाठी आपला लेंगा समोर करीत म्हणाली.

" मला एक सिगारेट दे" गणेशने दहाची नोट तिच्या पुढ्यात धरीत म्हटले.

" आवो थांबाहो जरा ... तिकडं लोक सगळं दुकान उचलून न्यायची पाळी आली ... जरा दम धरा की " मधुराणी एकदम चिडून गणेशवर खेकसली.

पण जेव्हा तिच्या लक्षात आले की तो गणेश आहे ती ओशाळून म्हणाली " गणेशराव तुमी होय ... मला वाटलं दुसरंच कोणीतरी हाय''

" नाही ... प्रथम तुझं होवूदे ... निवांत... तशी मला घाई नाही आहे..."

" पर आम्हाले हाय नं... " एक बाई गर्दीतून म्हणाली.

त्या बाईकडे रागाने एक कटाक्ष टाकत मधुराणी पुन्हा चिडून म्हणाली " ए बाई... लई घाई आसल तर दुसऱ्या दुकानावर जा ... ते तिकडं बगानं माझा नोकर ... त्या बाईला धरायला गेला हाय ... मी जर इथून गल्ल्यावरून उठून तुमचं सामान द्यायला जरा का इकडं तिकडं गेली की... ही चोट्टी लोकं माझं सार दुकानच लूबाडून नेतील..."

ती बाई गप बसली.

मधुराणीचं अगदी बरोबर होतं...

ती इथं गल्ल्यावर बसलेली असतांना जर एखादी बाई तिकडे गुळ चोरण्याची हिम्मत करु शकते...

तर ती का जराशीही पाठमोरी झाली तरी इकडे गर्दीतले लोक तीचं दुकान लूटू शकले असते...

" गणेशराव ... थांबा जरासं थांबा ... तो शाम आल्यावर देते हं " ती गणेशला म्हणाली.

तेवढ्यात मधुराणीच्या नोकराने त्या बाईला धरुन आणले.

" ए सटवे माह्यावर चोरीचा आरोप करतं का ... म्या इकत घेतलेला गुळ हाय हे... पैसे मोजलेत म्या ह्याचे..." ती बाई मधुराणीवर वरचढ होत म्हणाली.

" इकत घेतला ... आसं... " मधुराणी गल्ल्यावरून खाली उतरत म्हणाली.

'' ए शाम्या तू दुकानात जा आन लक्ष ठेव मी जरा बगते या बाईनं कव्हा इकत घेतला ते'' मधुराणी आता त्या बाईच्या पुढ्यात येऊन उभी राहाली.

" इकत घेतला तू ... आसं" मधुराणीनं त्या बाईच्या झीपोट्या धरत एक झणझणीत तिच्या गालात हाणली.

" सांगबर ... किती गुळ घेतला? ... अन्् केवढ्याचा धेतला?..." मधुराणीनं अजून एक तिच्या कानशीलात हाणली.

" ए बाई ... मारायचं काम नाय ... "

" मंग सांगनं किती गुळ घेतला? ... अन्् केवढ्याचा घेतला? " मधुराणीने तिच्या झीपोट्याला एक हिसका देत तिला खाली पाडले.

" सांगतो थांब .. " ती बाई उभं राहण्याचा प्रयत्न करीत म्हणाली.

" सांग की ..."

" अर्धा किलो... चार आण्याचा" ती बाई कशीबशी बोलली.

" चार आण्याचा अर्धा किलो कव्हापासून यायला लागला..." मधुराणीने आता तिच्या पाठीत एक बुक्की मारली.

तिच्या लेंग्यातला गुळ तिनं काढून घेतला अन् म्हणाली, " शाम्या मोज बरं हा गुळ किती भरतो ते..."

शामने मधुराणीच्या हातातले गुळाचे ढेकुळ घेतले आणि तराजूत टाकून तो मोजायला लागला.

" दिड किलो हाय मालकिण"

" हे बगा लोकहो ... ही बाई म्हण्ते ... इनं अर्धा किलो गुळ माह्याजवळून इकत घेतला ... अन् मंग हा दिड किलो कसा भरला ... अन् ती म्हण्ते तिनं मला याचे चार आणे दिले ..." मधुराणीने खाली बसलेल्या बाईच्या कमरेत एक लात मारली.

" आता बोल नं सटवे... भोसडीचेहो इथं या गावात येऊन चोऱ्या करता ... थांब आता तुव्ह इथं येणंच बंद करते... ए शाम्या ... मंघा हवालदार दिसला होतानरे..."

" हो मालकीण त्याची थैली इथच ठुईली त्यानं ... येतो म्हणला बजारातून ..."

" शाम्या एक दोरी आण ... इलं बांधून त्या पोलीसाच्याच हवाली करते..."

" मले माफ करा .बाई ... मी चुकली ... मी माह्या गालात मारुन घेतो पर मले पोलीसाच्या हवाली नका करु ... मह्या पोराबाळाचं कसं व्हईन" ती बाई गयावया करून मधुराणीचे पाय धरुन रडू लागली.

" आसं... पोराबाळाचं काय व्हईन... चोरी करतांनी नाय आठवले पोरंबाळं... '' मधुराणीने अजून एक लात तिच्या कमरेत हाणली.

" चाल उठ इथून महा धंद्याचा टायम हाय ... म्हूण सोडते... अन् याद राख पुन्हा माह्या दुकानावर दिसली तर... उठ अन् लवकर तोंड काळं कर इथून..." मधुराणीने तिच्या झीपोट्या धरुन उठविले.

ती बाई उठताच तिने तिथून काढता पाय घेतला.

" भिकारचोट लेकाचे... " म्हणत मधुराणी पुन्हा दुकानात जाऊन गल्ल्यावर चढली.

इतका वेळ गणेश तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याने मधुराणीचे हे असे चंडीचे रुप दुसऱ्यांदा बघितले होते.

पण काहीही असो मधुराणीची प्रसंग हाताळण्याची हातोटीच वेगळी आहे...

एखादी बाई असती तर गोंधळून गेली असती ...

आपल्या बायकोची नाही का एकदा ती मागे गाडीवर बसली असतांना एकदा एका भामट्याने पर्स हिसकाटून नेली ...

अन् कितीतरी वेळ तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता...

तो चोर पळून गेल्यावर कितीतरी वेळाने ती सावरली होती ...

पण तो पर्यंत चोर पळून गेला होता...

त्याजागी जर मधुराणी असती तर गाडीवरून उडी मारुन त्याच्या मागे धावली असती ...

अन् त्या चोराच्या मानगुटीला पकडेपर्यंत थांबली नसती ...

आज गणेशला भरुन आल्यासारखे होत होते आणि सारखे मधुराणीचे कौतुक वाटत होते.

अन् बाईच्या जातीने आजकाल असंच कणखर राहायला पाहिजे...

आपल्या देशातली जर प्रत्येक बाई इतकी कणखर झाली...

तर आपल्या देशात बाईची पिळवणूक होणे शक्यच नाही ...

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

  1. kharch aapla deshatli pratek bai ashi kankhar zali pahije......

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network