Marathi online literature - Madhurani CH-33 गावातली क्रिकेट

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi online literature - Madhurani CH-33 गावातली क्रिकेट

आत्तापर्यंत गणेशची ओळख गावातल्या इतर बऱ्याच लोकांशी झाली होती. गावातल्या इतर त्यातल्या त्यात पुढारलेल्या पोरांचं जमण्याचं ठिकाण म्हणजे गावातलं टेलरचं दुकान - मारोती टेलरचं दूकान. तिथे गावातली तरुण मंडळी जमून गावातल्या प्रकरणाची चर्चा होत असे. संध्याकाळी एखादा तास जरी तिथे घालवला तरी गावतल्या दिवसभराच्या प्रकरणाची इत्यंभूत माहिती मिळत असे. तिथल्या हौशी पोरांनी क्रिकेटची टीम तयार केली होती. ते रोज संध्याकाळी 5 ते 6-7 असे आंबराईत क्रिकेट खेळत असत आणि खेळणं झाल्यावर मग परत टेलरच्या दुकानासमोर गप्पांची मैफिल जमत असे. क्रिकेटचं सर्व सामान तिथेच टेलरच्या दुकानात ठेवल्या जात असे. त्यामुळे पोरं क्रिकेट खेळायच्या आधी आणि क्रिकेट खेळणं झाल्यावर पुन्हा तिथेच जमत असत. गणेशने या इतक्या मागासलेल्या खेड्यात पोरांना क्रिकेटचा नाद कसा जडला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. तर रेडीओवर क्रिकेटची कॉमेंट्री ऐकता ऐकता त्या पोरांना क्रिकेटचा छंद जडला होता. गावसकर वेंगसकर, अमरनाथ अशी नावं त्या पोरांच्या तोंडी येत. मग काय सुताराच्या पोराने बॅट आणि स्टंप बनविण्याची जबाबदारी घेतली. चंभाराच्या पोराने सुताराच्या पोराने केलेल्या लाकडाच्या गोल चेंडूला एकदम मस्त कमावलेल्या चामड्याचे आवरण चढवले आणि झाला क्रिकेटचा चेंडू. झालं क्रिकेटचं सामान.

गणेशही संध्याकाळी त्या पोरांसोबत क्रिकेट खेळण्यात रमू लागला. खरोखर काही काही पोरांचे त्या खेळातले कौशल्य पाहून कधी कधी गणेश थक्क होऊन जात असे. महादा नावाचा पोरगा तर अशी बॉलींग करत असे की चांगल्या चांगल्यांची तारांबळ उडत असे. त्याचा वेगवान चेंडू येतांना पाहून तर बरीच जणं स्टंप सोडून बाजूला होत. जखमी तर त्याने किती जणांना केलं होतं. मग मात्र टेलरने पायाला लावण्याच्या पॅड बनविण्याची जबाबदारी घेऊन कापडाच्या आत कापुस टाकून पॅड बनविले. पण एक पोरगा लोखंड्या तो मात्र कितीही वेगवान चेंडू असो बिना ग्लोब्जचा विकेट किपींग करायचा. गणेशने एकदा आश्चर्य वाटून त्याचे तळहात बघितले होते. तो गीट्टी फोडणे, गिट्टीची टोपली उचलणे, विहिरी खोदणे अशी मेहनतीची कामं करीत असे. त्याच्या तळहातावर मेहनतीचं काम करून करून घट्टे पडले होते आणि जाड कातडीचा थर तयार झालेला होता. म्हणजे त्याच्या हातावर नॅचरल ग्लोब्ज तयार झाले होते. ज्या पोराला गावातले सगळे जण येडा म्हणत तो तर ऑलराउंडर होता. त्याला बॉलींग टाकायला सांगितली की त्याचा सबंध फक्त त्याच्या हातातल्या चेंडूशी आणि समोरच्या तीन स्टंपशी असे. त्याला बाकी कशाचही भान राहत नसे. तसच त्याला बॅटींग करण्यास सांगितली तर त्याचा सबंध चेंडूशी आणि त्याच्या हातातल्या बॅटशीच राहत असे. फिल्डींगमध्येही तो चोख होता. मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रीशीयन बबन तर इंटीलीजेंट क्रिकेटर होता. नविन नविन शॉट शोधन्यात आणि नविन नविन प्रकारचे चेंडू फेकण्यात त्याचा हात कुणीच धरत नसे. ऑफिसमधला पांडू त्याला फक्त एखादा ओव्हर बॅटींग जरी करु दिली तर त्याच्या बदल्यात क्रिकेटचे सामान टेलरच्या मशीनमधून ग्राऊंडपर्यंत आणत असे. पण सामान परत ठेवायच्या वेळी प्रत्येक वेळा तो गायब झालेला असे. मारोती टेलर असाच कधीतरी येऊन एखादा दोन बॉल खेळून जात असे. कारण त्याला त्याच्या टेलरिंगच्या कामापासूनच बिलकुल फ़ुरसत मिळत नसे. जेव्हा तो बॅटींग करायला उभा राही तेव्हा त्याला बॅटने बॉल मारण्यापेक्षा जास्तीत जास्त लक्ष स्वत:चे धोतर सांभाळण्यासाठी द्यावे लागे.

'वाईड' बॉलला ती पोरं 'वाईट बॉल' म्हणत असत आणि आऊट ची अपील 'आऊट दे' असं जोरात ओरडून करीत. अशा बऱ्याच क्रिकेटच्या गंमती होत्या की गणेशला त्या गंमतींचं हसू येत असे. एकदा 6-6 पोरांच्या दोन टीम करून मॅच खेळण्यात येत होती. 6 जणं एका बाजूने म्हणजे ते तसे कमीच होते. म्हणून फिल्डींग दोन्ही टीमचे पोरं मिळून करीत. त्यातल्याच एकाजणाला ते अंपायरसुध्दा करीत. जी टीम बॉलींग करीत होती त्यातल्याच एका पोराला अंपायर करण्यात आले. बॉलींग करणाऱ्याने बॉल टाकला आणि तो बॅटमनच्या पॅडला लागला. बॉलींग करणाऱ्या टीमची आता अपील करण्याची वेळ होती. त्या टीमच्या सगळ्यात आधी कुणी अपील करावी तर ती अंपायरने केली होती. तो त्या क्षणापुरता विसरला होता की तो अंपायर आहे. गणेशसहित सगळे जण गदगदून हसायला लागले होते.

गावतल्या टमरेल घेऊन घराच्या बाहेर पडलेल्या लोकांनाही ही क्रिकेटची फुकटची करमणूक आवडू लागली. ते आपले आमराईच्या झाडाखाली सावलीत उभे राहून एका हातात रिकामा टमरेल घेऊन क्रिकेटचा आनंद घेत. मधुराणीही आता गणेश खेळायला येऊ लागल्यापासून तिथे आंब्याच्या झाडाखाली उभं राहून घटकाभर का होईना त्याला दाद देत होती. कधी कधी तर गावातली पाटील, सरपंच, यासारखी प्रतिष्ठीत मंडळी सुध्दा तिथे यायची. आणि घटकाभर न चूकता थांबून जायची. पाटील तर आल्या आल्या सरळ ग्राऊंड मधे घुसायचे.

" ए गणप्या जरा आण रे बॅट हिकडं "

गणप्या स्टंप सोडून पळत जाऊन पाटलाच्या हातात बॅट द्यायचा.

" ए तुमच्यापैकी कोणाची बॉलींग चांगली हाय रे " बाह्या वर सरकवत पाटील म्हणायचे.

" पाटील ... महाद्या लय बेस बॉल टाकतो "

" आबे तशी नाय ... झोडायला कोणाची चांगली हाय"

मग बबन्या आपला बॉल घेऊन त्याच्याच्याने जेवढी हळू बॉलींग टाकता येईल तेवढी हळू बॉलींग टाकायचा. एवढ्या हळू बॉलींगवर पाटील आपले झपाझप झोडायचे. पाच सहा बॉल खेळल्यावर पाटील ती बॅट एकीकडे खाली जमिनीवर टाकत म्हणायचे

" धत ... तेरी ... मंग याच्यापर आपलं गिल्लीदांडू काय वाईट हाय रे पोरोहो"

पोरं नुसते फिदीफिदी हसायचे.

" आजकालची ... पिढीच लय फुसकी ... आमच्या येळी दिसभर उन्हातान्हात गिलीदांडू, कबड्डी, धप्पाकुटी खेळायचो... अन् राती पुन्हा लपाछपी खेळायचो..." म्हणत ते बाह्या खाली सरकवत तिथून निघून जात.

पोरं पुन्हा आपला खेळ पूर्ववत खेळू लागत.

contd…

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network