Marathi kathanak - Madhurani - CH-43 कुठं गेली ती?"

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi kathanak - Madhurani - CH-43 कुठं गेली ती?"

गणेश सकाळी मधुराणीच्या दुकानावर गेला तर दुकान उघडंच होतं. पण मधुराणी दुकानावर नव्हती. गल्ल्यावर विलास बसला होता - शेजारचा मुलगा. पूर्वी त्याच्याकडूनच मधुराणी हिशोब करून घेत असे. गणेशला वाटले की त्याला विचारावे की मधुराणी कुठे गेली? पण त्याने विचारले नाही. त्याची हिम्मतच झाली नाही.
न जाणो त्याला काय वाटेल?...
इतक्या सकाळी सकाळी विचारणं योग्य नव्हे...
येईल इथेच कुठेतरी गेली असणार ...
दुपारीही दुकान बंद होण्याच्या पूर्वी एकदा गणेशने जाऊन पाहले पण मधुराणी परत आली नव्हती. पुन्हा गल्ल्यावर विलासच बसलेला होता. तसा तो पूर्वीही कधी कधी मधुराणीच्या दुकानावर बसत असे. पण इतका वेळ सलग त्याला बसतांना गणेशने तरी पूर्वी कधी बघितले नव्हते. तसं गणेशला तो त्याच्या खिडकीतूनही गल्ल्यावर बसलेला दिसला असता पण का कोण जाणे त्याला दुकानावर गेल्याशिवाय समाधानच लाभत नसे. न जाणो आपण जाईपर्यंत कदाचित ती येईलही. एक वेडी आशा!
कुठे गावाला बिवाला गेली का ही बया?...
आणि तेही आपल्याला न सांगतां...
गणेशला पुन्हा विलासला विचारण्याची इच्छा झाली.
पण नाही नको ...
संध्याकाळी येईलच ती.
संध्याकाळीही जेव्हा गणेशने दुकानावर चक्कर मारली तेव्हासुध्दा त्याला विलासच गल्ल्यावर बसलेला दिसला.
आता मात्र याला विचारायलाच पाहिजे...
"काय आज तू कसा काय दुकानावर?..." गणेशने जेवढं शक्य होईल तेवढं प्रश्न सहजच वाटावा याची काळजी घेतली.
तो सरळ थोडीच सांगणार होता.
" काय काम हाय का?" त्याने विचारले.
" नाही सहजच विचारले " चेहऱ्यावर कोणतेही हावभाव न येण्याचा प्रयत्न करीत तो म्हणाला.
तो ही वस्ताद होता.
" नाय सकाळपासनं तिसरी चक्कर हाय तुमची म्हून इचारलं" तो गणेशकडे रोखून पाहत त्याच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेत म्हणाला.
" हो तसं काम होतचं... कुठं गेली ती?" गणेशने आता स्पष्टच विचारलं.
तसा त्याच्याजवळ दुसरा पर्यायसुध्दा नव्हता. पुन्हा इकडचं तिकडचं बोलावं तर पुन्हा शंका यायची.
" ते गेली हाय शेतात"
" शेतात ... शेतात काय निंदायला गेली का काय?" गणेश मुद्दाम वातावरण मोकळं करण्याच्या उद्देशाने गंमत करीत हसून म्हणाला.
" नाय तीचं खळं हाय ना आज... म्हून गेली"
" खळं... पण ते सगळं तर संभाजीराव बघतात ..."
" ते मलं माहित नाय बॉ" तो म्हणाला आणि समोर उभ्या असलेल्या गिऱ्हाइकाला अटेंड करु लागला.
गणेशलाही आता त्याला जास्त काही विचारण्यात स्वारस्य वाटत नव्हते.
आता ही बया खळ्यावर कशाला बरं गेली असेल?...
म्हणजे एवढ्यात यायला पाहिजे शेतातून...
गणेश दुकानावरून वळून बाजाराकडे जायला लागला. उगीच. तसं आज गुरुवार नसल्यामुळे बाजारात रिकाम्या मैदानाशिवाय काहीही नव्हते.
पण तेवढाच वेळ जाईल...
खोलीवर बसून तीची वाट पाहत बसण्यापेक्षा हे बरं आहे...
सकाळ दुपार संध्याकाळ आणि मग रात्रीही वाट पाहून मधुराणी आली नव्हती. गणेश अगदी तिच्या विरहाने कासाविस झाला होता. आता पुन्हा तिच्याबद्दल कुणाला विचारण्याची त्याची छाती नव्हती. खरंच आपण किती गुरफटत आहोत तिच्यात...
हे काही बरं लक्षण नव्हे...
पण काहीही असो तिच्याचमुळे तर या खेड्यातली आपली नोकरी सुसह्य होत आहे...
नाही तर इथे अश्या नीरस जागी नोकरी करणं खरोखरच किती कठीण गेलं असतं...
रात्री तिच्याबद्दल विचार करता करता त्याला केव्हा झोप लागली कळलंच नाही. अचानक त्याला रात्री जाग आली. जाग आल्याबरोबर त्याच्या मनात पहिला विचार मधुराणीचाच आला.
ती आली असावी की नाही...
चला थोडा चहाळ घेऊया...
गणेशने बेडवरून उठून खिडकीतून बाहेर डोकावून बघितले. बाहेर त्याला मधुराणीच्या घराच्या बाजूला एक खोली होती त्या खोलीसमोर बैलगाडी उभी असलेली दिसली. त्या खोलीचा मधुराणी तिच्या शेताचा माल ठेवण्यासाठी गोडावून म्हणून वापर करत असे. कदाचित मधुराणीचा शेतीचा माल आला होता. आणि ती तो ठेवून घेत होती.
चला येरवीतरी झोप येतच नाही आहे...
जाऊन मधुराणीशी दोन शब्द बोलावे...
तेवढंच मनाला बरं वाटेल...
असा विचार करून गणेश उठला. शर्ट आणि पँट चढवला. आजकाल उन्हाळ्याची गर्मी जास्त होत असल्याने गणेश झोपतांना बनेन आणि अंडरपँटवरच झोपायचा. खोलीच्या बाहेर येऊन दाराला कडी चढवली आणि तो मधुराणीच्या गोडाऊनकडे जायला लागला.
क्रमश:..

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network