Marathi wangmay - Madhurani - CH-51 निर्धार

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

गणेशराव आज सकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहाने लवकरच उठले. बाहेर जाऊन एक मोठा फेरफटका मारला. रस्त्यावरून जातांना त्यांना बगीच्यात काही व्यायाम करणारे लोक दिसले. तेही बगीच्यात गेले. तिथे त्यांना जे जमतील ते व्यायामाचे प्रकार करु लागले.
आपल्याला आता थोडं चूस्त तंदूरुस्त व्हायला पाहिजे...
पोटही नगाऱ्यासारखं बाहेर निघालं आहे... त्याला आत घातलं पाहिजे...
व्यायाम करता करता ते लवकरच थकले.
सवय नाहीना... मग हे असंच होणार...
काही हरकत नाही हळू हळू स्टॅमीना वाढेल...
व्यायाम केल्यामुळे त्यांच्या अंगात घाम आला होता. आणि घामामुळे बगीचातली थंडगार हवा अंगाला अजूनच झोंबत होती.
कसं मोकळं मोकळं वाटते...
कसं मुक्त मुक्त झाल्यासारखं वाटत आहे...
अगदी साऱ्या बंधनातून मुक्त झाल्यासारखं...
पण आपण चूकीचा मार्गाने तर जात नाही ना?...
एवढं आपलं जीवन जीने आपल्यासाठी झिजवलं...
त्या बायकोकडे एकदम अशी पाठ करायची?...
आता जरी आपण तिला कंटाळलो असलो तरी...
कधी काळी आपण तिच्यावर प्रेम केलंच की...
पण हे प्रेम.. प्रेम ..म्हणजे तरी काय ...
स्वत: भोवती रेशीम किड्याने रेशमाचा कोष विणावा तसा कोष...
ज्यात त्याला आनंद विश्वास आणि सुरक्षतेची खरी, खोटी...
काल्पनीक... कशी का होईना जाणीव वाटते...
पण एक दिवस त्या रेशीम किड्याचे जेव्हा फुलपाखरात रुपांतर होते...
ते सुध्दा एवढ्या मेहनतीने केलेला तो कोष कुरतडून बाहेर पडतेच की...
आणि मग ...
सगळ्या बंधनातून मुक्त या फुलावरून त्या फुलावर कसेे स्वच्छंद उडत सुटते....
आज सकाळी घरी दाढी केल्यानंतर गणेशरावांनी विन्याला आदेश दिला,
" ए एक स्वयंपाक घरातून वाटी घेऊन ये रे..."
विन्याला आपल्या बापाचं वागणं प्रथमच वेगळं वाटत होतं. एवढ्या हक्काने त्याच्या बापाने आधी कधीही त्याला आदेश दिला नव्हता. त्याने नुसती एक आश्चर्यकारक नजर आपल्या बापावर टाकली आणि तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आपल्या सकाळच्या पुढच्या कामाला लागला. पोरगा ऐकत नाही असं पाहून गणेशरावने आपला मोर्चा आपल्या बायकोकडे वळवला.
" ए आतून एक वाटी घेऊन ये..."
थोडा वेळ गणेशरावने वाट पाहली तरी आतून काहीच प्रतिसाद नाही की काही हालचाल नाही असं पाहून गणेशराव जोराने ओरडले.
" ए किती वेळचं मी बोंबलतो आहे एक वाटी आण म्हणून"
ओरडण्याचा योग्य परिणाम झाला.
आतून बायकोने एक स्टीलची वाटी आणून गणेशरावच्या पुढ्यात ठेवली आणि ती बडबड करीत पुन्हा स्वयंपाकखोलीत गेली.
" ए एखादा जुना ब्रश आहे का गं?" पुन्हा गणेशराव बायकोला उद्देशून म्हणाले
" ब्रश? ... कशाचा ब्रश?"
" दात घासायचा.. अन् कशाचा"
" कशाला?"
" जास्त चांभार चौकशा करु नको... आहे का तेवढं सांग फक्त" गणेशराव पुन्हा ओरडले.
" हो बघते ... मिळाला तर देते" आतून गणेशरावची बायको ओरडली.
विन्या त्याच्या बापासमोर येऊन उभा राहिला.
" झाली का पुन्हा सुरु तुमची वटवट" विन्या बापावर खेकसला.
" ए तू चूपरे... मोठ्या माणसांशी कसं बोलावं काही समजतेका तुला?" गणेशराव विन्यावर खेकसले.
या अनपेक्षित उत्तराने विन्या गांगरलाच. त्याला काय बोलावे काही न सुचल्यामुळे त्याने तिथून काढता पाय घेतला.
" सापडला का?" गणेशराव पुन्हा बायकोवर ओरडले.
" नाही... जुनं सामान मी घरात ठेवत नसते... तेव्हाच फेकून देते." आतून आवाज आला.
" मग माझा जो आता वापरतो तोच ब्रश आण इकडं" गणेशरावने आदेश दिला.
गणेशरावच्या बायकोने त्यांचा ब्रश त्यांच्यापुढे आणून ठेवला आणि काही न बोलता तिथून ती निघून गेली.
थोड्या वेळाने विन्या त्याच्या बापाजवळ येऊन उभा राहाला तो बघतच राहाला.
" ए आई... " त्याने आत आईला मोठयाने हाक मारली.
" काय रे?... तुझ्या बापाचं झालं ... आता तू बोंबल.." आतून त्याची आई चिडून म्हणाली.
" अगं इकडं तर ये... लवकर ये... एक गंमत दाखवतो तुला " विन्या हसत म्हणाला.
त्याची आई लगबगीनं बाहेर आली. विन्याजवळ येऊन उभी राहून तीही गणेशरावकडे बघत राहाली ती बघतच राहीली.
गणेशराव ब्रशने वाटीत कलप कालवून त्यांच्या पांढऱ्या केसांना लावत होते. त्यांचे अर्ध्याच्या वर केस काळे करून झाले होते.
" आता याला काय म्हणायचं?" विन्या कुत्सितपणे म्हणाला.
" म्हातारचाळे ... दुसरं काय... माणूस चळला की असाच वागतो ... साठी अन् बुध्दी नाठी म्हणतात ते काही खोटं नाही" तनक्याने गणेशरावची बायको म्हणाली आणि पाय आपटत स्वयंपाकघरात घुसली.
" ए.... पन्नासच वर्ष झाले... साठीला अजून दहा वर्ष वेळ आहे म्हटलं.... " गणेशराव आपल्या मिशीवर ताव देत आपल्या बायकोकडे पाहत म्हणाले.
क्रमश:...This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network