Marathi Novel - Madhurani - CH-56 निवडणूका

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

निवडणूका जवळ आल्या होत्या. त्यासाठी प्रचार ही आवश्यक बाब होती. त्यानिमित्ताने आज मधुराणीने शहरात सभा ठेवली होती. चारपाच लाखाच्यावर पब्लीक येणार होती. मधुराणीने स्टेज, प्रमुख पाहूणे, त्यांची सेक्यूरीटी इत्यादि जबाबदारी आपल्या जवळच्या कार्यर्कत्यांना वाटून दिली होती. तसं मधुराणीचं मॅनेजमेंट फार चांगलं होतं. त्याचा अनुभव गणेशरावने आधीही बरेच वेळा घेतला होता. मधुराणीच्या सेक्यूरीटीची जबाबदारी गणेशराववर येऊन पडली होती. तसं सेक्यूरीटीसाठी पुलिस होतीच. पण गणेशरावला त्यांच्याशी संपर्कात राहून पूर्ण व्यवस्था करण्याची जबाबदारी होती. मधूकररावकडे पब्लीक जमा करण्याची जबाबदारी होती. त्यांचं जवळच्या गावांतून ट्रकच्या ट्रक भरुन लोक आणनं सुरु होतं. लोकांनाही फुकटात तालूक्याच्या ठिकाणी फिरुन येण्याची नवलाई होती.
सभा आमराईत ठेवली होती. ती आमराई म्हणजे शहराच्या मधे एक मोठे पटांगण होते. आंब्याचे तिथे तुरळक दोन तीन झाडेच होती. पूर्वी कधीतरी तिथे आमराई असावी. तेव्हापासून त्या पटांगणास लोक आमराईच म्हणायचे. सभा भर दुपारी असल्यामुळे लाईटींगचा तेवढा प्रश्न नव्हता. स्टेजचे काम ज्या कार्यर्कत्याकडे दिले होते त्याने स्टेज उभारण्याचे काम चोख बजावले होते.
हळू हळू लोकांची गर्दी जमा व्हायला लागली. जवळपासच्या खेड्यांवरून ट्रकच्या ट्रक येत होते आणि गिट्टी रेती आणून ओतावी तसे लोकांना ते आणून उतरवत होते. आणि पुन्हा जात होते - पुढच्या ट्रीपसाठी. शहरातल्या लोकांचासुध्दा येण्याचा ओघ सुरु झाला होता. पण शहरातले लोक जेमतेमच होते.
स्टेजवर लाऊडस्पीकरवाल्यांची गडबड सुरु झाली. तो एक एक माईक लावून त्याचं माईक टेस्टींग वैगेरे करीत होता. खेड्याची लोक त्याचीसुध्दा मजा घ्यावी तसं ते लक्ष देऊन पाहत होते. तेवढ्यात एक आलीशान कार तिथे आली. त्यातून मधूकरराव आणि दुसरे मधुराणीचे जवळचे कार्यकर्ते उतरले. गणेशरावही त्याच कारमधून उतरले. मधूकररावने इकडे तिकडे एक पाहणी केल्यासारखी नजर फिरविली. मध्ये जो भेटेल त्याला 'सगळं व्यवस्थित आहे ना' अशी विचारणा केली आणि ते त्या कारमध्ये बसून पुन्हा पसार झाले. कदाचित ते आता पुन्हा येणार होते ते मधुराणीला घेऊनच.
पोलीसांचे ताफे येऊन इकडे तिकडे विखुरले. गणेशरावचं आता फक्त काम होतं ते त्यांच्या हाताखाली जे शंभरएक कार्यकर्ते होते त्यांना स्टेजच्या आजूबाजूला विखरुन पसरवीनेे. कारण जनतेच्या संरक्षणाची काळजी करणं हे त्यांचं काम नव्हतं. ती पोलीसाची जबाबदारी होती. आणि मधुराणीच्या संरक्षणासाठी जो पोलीसांचा ताफा होता त्याच्या व्यतिरिक्त तिच्या संरक्षणाचं काम करणं ही गणेशराव आणि त्यांच्या कार्यर्कत्त्याची जबाबदारी होती. आणि संरक्षण म्हणजे तरी काय की जे खरोखरच मधुराणीपर्यंत पोहोचण्याच्या लायकीचे आहेत त्यांनाच तिच्यापर्यंत पोहोचू देणे आणि बाकीच्या जनरल पब्लीकला रोखने.
उजनीचे लोक ट्रकमधून येऊन उतरले तसं गणेशरावचं तिकडे लक्ष गेलं. त्यातले बरेच लोक गणेशरावच्या ओळखीचे होते. गणेशराव त्यांना भेटण्यासाठी तिकडे गेले. गणेशरावची प्रथम भेट सदाशीच झाली. सदाला पाहताच त्याने दारु पिऊन त्यांना दिलेली शीवीगाळ आठवून हसू फुटले. सदा आता खूपच थकला होता. गणेशरावपेक्षा एखाद दोन वर्षाने मोठा असावा तो. पण तो अगदीच बारीक किडकिडा आणि म्हातारा दिसत होता.
" काय सदा कसं काय?" गणेशरावने त्याची विचारपुस केली.
तो गणेशरावकडे अचंब्याने पाहू लागला.
" गणेशराव?" तो आनंदाने म्हणाला.
" काय तब्येत खूप हालली तुझी" गणेशराव म्हणाले.
" तुमच्यातबी लय बदल झालाकी हो... आंगात भरल्यासारखे वाटता.. अन् हे काय ... लिडर बिडर झाले का काय?" तो म्हणाला.
त्याच्या चेहऱ्यावर अगदी आनंद मावत नव्हता.
" काय दारु बिरु सुटली का नाही आता?" गणेशराव गंमतीने म्हणाले.
त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आता एकदम नाहीसा झाला.
" आता जीवासंगच सुटणार आसं वाटते " तो म्हणाला.
गणेशरावला वाईट वाटत होते की त्याला हा प्रश्न उगीच विचारला.
" अजून कोण कोण आलं उजनीवरून?" गणेशरावने त्या ट्रकमधून उतरणाऱ्या गर्दीकडे पाहून म्हटले.
" हायत की ... आजून एक टरक येणार हाय म्हणत्यात..."
" सरपंच येणार आहेत का?" गणेशरावने विचारले.
त्याचा चेहरा पुन्हा काळवंडला.
" सरपंच गेले .. पाच सहा वर्स झाले" तो गंभीरतेने म्हणाला.
" कसं काय? " गणेशरावने आश्चर्याने विचारले.
" अवो वय झालं होतं... गेले ते बरं झालं ... लई तरास होता त्यानला... डोळ्यांनं दिसत नव्हतं... पायानं चालता येत नव्हतं... हागनं मुतनं जाग्यावरच करत होते... पोरगं त पाहत नव्हतं त्याचेकडे... म्याच केलं त्याचं त्या काळात... अवो शिलींगची का होईना त्यानी जमीन देली होती आमाला... पोरगं इसरलं आसल पर म्या नाय इसरलो त्याचे उपकार... ते कोणालाबी देऊ शकलं आसतं... पर त्यानं मलेच देली होती जमीन..." सदा अगदी गहीवरून येऊन बोलत होता.
गणेशरावला प्रथमच सदाची एक वेगळी बाजू माहित झाली होती. ते मोठ्या आदराने त्याच्याकडे पाहत होते .
तेवढ्यात गणेशराव उजनीला असतांनाचा तिथला चपराशी पांडू लगबगीनं गणेशरावजवळ आला.
" राम राम सायेब " त्याने आनंदाने गणेशरावला वाकून नमस्कार केला.
" अरे कसं काय? ..." गणेशराव त्याला म्हणाले.
तो वयाने जरी पोक्त झाला होता तरी त्याची वागण्याची आणि हाजी हाजी करण्याची तऱ्हा अजूनही बदलली नव्हती.
" काय रे आता कोण असतो ग्रामसेवक?..." गणेशरावने विचारलं.
" आता काय माहित नाय सायेब... तुमी तिथून गेले अन् म्या ते काम सोडलं... तुमी होते तोवर त्या कामात दम होता.. तुमच्यानंतर आला तो ग्रामसेवक सोताच पैसे घेत होता... मंग आपलं कामच काय तेथं... मंग माव्ह लगीनबी झालं अन् आता सिडच्या मानसामांग आसतो... बटईनं घेतलंनं सीड ... त्या गार्डसायेबाचं... "
" अरे वा ... म्हणजे आता मस्त चाललं असेल..." गणेशराव म्हणाले..
" हो तसं मस्तच हाय... पर तुमी होते तवासारखी आता गावात मजा नाय राह्यली"
क्रमश:...This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network