Marathi online library - Madhurani CH-53 अमुलाग्र बदल

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

हळू हळू गणेशरावचे मधुराणीच्या बंगल्यावर जाणे वाढले. त्यांच्यात आता अमुलाग्र बदल झाला होता. त्यांचा पेहरावही आता कायमचा बदलला होता. खादीचा पांढरा सदरा आणि पायजामा. स्थुल शरीरातही आता तल्लखपणा येऊ लागला होता. त्याचं सकाळी नियमित व्यायाम करणं, फिरायला जाणं सुरु झालं होतं. पूर्वी त्यांना घरात ना पोरगा ना बायको कधी भ्यायची ते आता वचकून राहू लागले होते. पोरगा वचकून राहण्याचं कारणही तसंच होतं. मधुराणीकडे त्यांनी त्याचे प्रकरण लावून धरुन त्याला नगरपालिकेत चिकटवून दिले होते. पोरगा ही नोकरी लागल्यामुळे खूश होता आणि बायकोही नवऱ्याला उतरत्या वयात का होईना अक्कल आली या गोष्टीमुळे खूश होती. बदलीही मधुराणीच्या वशील्याने रोखली गेली होती. आता ते मधुराणीचे फुल टाईम कार्यकर्ते म्हणून काम करु लागले. मधुराणीचं कृपाछत्र म्हटल्यावर ऑफिसमध्येही त्यांची नियमित गैरहजरी कुणाला खटकत नसे. त्यांचे वरिष्ठ त्यांना वचकून राहू लागले. किंबहुना त्यांचच काही काम असल्यास मधुराणीकडे शब्द टाकण्यास गणेशरावचीच मदत घेऊ लागले.
मधुराणीच्या अगदी जवळच्या कार्यर्कत्यांच्या गोटात त्यांची वर्णी लागली होती. त्यामुळे ते रात्री बेरात्री मधुराणीच्या बंगल्यावरच राहू लागले. पण आता त्यांना मधुराणीच्या आतल्या गोष्टी कळू लागल्या. बऱ्याच वेळा त्यांना कळायचे की आज रात्री मधुराणी आणि मधूकररावांचा मुक्काम फार्महाऊसवर आहे. फक्त ही एक गोष्ट सोडल्यास मधुराणीच्या सगळ्या गोष्टीने ते फार प्रभावीत झाले होते.

असा एखादा दिवस आपल्याही जीवनात येईल ...
की मी आणि फक्त ती फार्महाऊसवर रात्री मुक्कामाला असू... हा मधूकरराव कधी मधे येणार नाही...
त्या मधूकरराववर नुसतं चिडून काही होणार नाही...
ह्या गोष्टी सयंमानी घ्याव्या लागतात...
आणि एक दिवस जेव्हा मधुराणीला कळेल की आपणही तिच्यावर जीव ओवाळून टाकू शकतो...
त्या दिवशी नक्कीच ती आपल्याला मधूकररावापेक्षा जवळ करेल...
कधी मधूराणीचा मुक्काम बंगल्यावर असायचा आणि मधुकरराव नसायचा तेव्हा मधुराणीच्या बेडरुममधे गणेशरावांचं वास्तव्य असायचं. पण ही गोष्ट कुणाला माहित नव्हती. पण अशा गोष्टी लपत थोडीच असतात. हळू हळू ती बातमी पसरत पसरत मधूकरराव जवळ पोहोचली असावी. कारण एक दिवस काही कारण नसतांना मधूकररावांनी गणेशरावांशी भांडण उकरुन काढलं. आणि त्यांच्यात चांगलीच वाजली. गणेशरावही भीणारे नव्हते. त्यांनीही मधूकररावांची काही तमा न बाळगता त्यांच्या प्रत्येक हल्याला सडेतोड प्रत्यूत्तर दिले. पण जेव्हा मधूकररावांना अपेक्षा होती त्याप्रमाणे गणेशराव दबले नाहीत तेव्हा मधूकररावांनीच झुकतं घेतलं. पण गणेशरावही काही कच्चे नव्हते. त्यांनी मनोमन जाणलं की राजकारणी जेव्हा झुकतं घेतो तेव्हाच तो जास्त धोकादायक असतो. आणि ज्या अर्थी मधूकरावांनी पाटलाचा एका दिवसात निष्ठूरपणे काटा काढला होता त्या अर्थी ते कोणत्याही स्तराला जावू शकत होते. पण मधुराणीने तसा इशारा केल्याशिवाय ते त्या स्तराला जाणार नाहीत अशी गणेशरावांना अपेक्षा होती. गणेशरावांना आता कल्पना येत होती की नर मधमाशीचे जिवन किती खडतर असते आणि तिच्या प्रत्येक पावलागणीक एकदम जीव जाण्याचाच धोका असतो. पण जिव जाण्याच्या भितीवर त्यांनी तेव्हाच मात केली होती जेव्हा त्यांनी मधुराणीची नर मधमाशी होण्याचं ठरविलं होतं.

एक दिवस गणेशरावांना बंगल्यावर एक माणूस भेटला. गणेशरावने लोकांच्या गर्दीत त्याला ओळखले नव्हते. तोच गणेशरावजवळ आला
" नमस्कार गणेशराव... मंग वळखलं का नाय"
" ओळखलं कसं नाही... " गणेशराव आठवण्याचा प्रयत्न करीत म्हणाले.
त्यांना बंगल्यावर असे बरेच लोक भेटायचे. कुठे न कुठे त्यांच्या नोकरीच्या दिवसांत त्यांच्याशी गणेशरावचा सबंध आलेला असायचा. कुणाला एकदम ओळखलं नाही असं म्हटलं तर वाईट वाटायचं म्हणून कधी कधी तर गणेशराव न ओळखूनसुद्धा ओळखल्यासारखे वागायचे - बोलायचे.
राव तुमी तर लय आतल्या गाठीचे निघाले... आम्ही लेकाचे मर मर मेलो अन् जन्मभर ग्रामसेवकच राहालो... " तो म्हणाला.
आता कुठे गणेशरावच्या लक्षात आले. ते खराडे साहेब होते. उजनीला जॉईन होतांना ज्याच्याजवळून गणेशरावने चार्ज घेतला होता ते.
" नाही म्हटलं करावी आपली थोडी समाजसेवा " गणेशराव म्हणाले.
" आवो ती करायला भेटायलासुध्दा नशिब लागते... तीकडं ऑफिसात लोकांकडून कळला मला तुमचा दरारा... सगळे ऑफिसर वचकून राहतात तुम्हाला... " वराडे साहेब म्हणाले.
" तुमच्यासारख्यांची कृपा आहे बस तेवढच" गणेशराव आता लोकांना मोठेपणा द्यायचं शिकले होते.
" बरं एक काम होतं तुमच्याकडं... " तो म्हणाला.
गणेशराव एकदम सतर्क झाले.
साला काम आहे म्हणून जवळ आला...
नाहीतर विचारलं नसतं लेकानं...
" बोला... आमच्या आवाक्यात असेल तर जरुर करु... " गणेशराव म्हणाले.
" नाय ते बदलीचं होतं... " खराडे साहेब म्हणाले.
" ते बदलीचं सोडून बोला... आजकाल जो तो ऊठसूठ बदलीचं घेऊन येतो... सगळ्यांना तालूक्याच्या जवळपासच बदली पाहिजे ... पण मग अश्यानं कसं होणार... कुणीतरी खेड्यावर काम करायला पाहिजेचकी..." गणेशराव म्हणाले.
" नाय सायेब ,... मला तालूक्याच्या जवळ नाय ... खेड्यावर बदली पायजे " खराडे साहेब म्हणाले.
"खेड्यावर? ... सगळ्याजणांना शहराच्या जवळ बदली पाहिजे... खेड्यावर बदली करून मागणारे तुम्हीच पहिले भेटले बघा मला..." गणेश आश्चर्य व्यक्त करीत म्हणाला.
" हो सायेब मला खेड्यावर म्हणजे उजनीलं बदली करून पायजे... ते माझ्या गावाजवळ पडते ना..." खराडे साहेब म्हणाले.
ते आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे असुनही त्यांनी गणेशरावला 'साहेब' म्हटले होते. पण गणेशरावला आजकाल त्याची सवय झाली होती.
" अच्छा... अच्छा... पण आता तिथं कोण आहे?..." गणेशरावने विचारले.
" हाय एकजण... देशमुख कुणीतरी" खराडे साहेब म्हणाले.
" पण त्याला तिथून बदली पाहिजे का.? " गणेशरावने विचारले.
" ते माहित नाय?" खराडे साहेब म्हणाले.
" माहित नाही... असं कसं अर्धवट काम करता राव तुम्ही ... आधी ते माहित करा... जर म्यूच्यअल होत असेल तर बरंच आहे... " गणेशराव म्हणाले.
" उडत उडत ऐकलं होतं की त्याचंही गाव उजनीच्या जवळपासच हाय म्हणून .... तो तिथून हालणार नाय असं वाटते.." खराडे साहेब म्हणाले.
" हं, आता कसं बोललां... अहो आमच्याजवळ काही लपवून काही उपयोग नाही ... डॉक्टरजवळून आणि राजकारण्यापासून काही लपवू नाही म्हणतात ते काही उगंच नाही. " गणेशराव टोमणा मारत म्हणाले.
" नाय सायेब तसं नाय... अन् त्यानंबी संपतराव पाटलाच्या लग्यानं काम केलं होतं म्हणतात.." खराडे साहेब म्हणाले.
" संपतराव पाटलाच्याचना ... पण ते तर आता देवाघरी गेलेत..." गणेश उपाहासाने म्हणाला.
" पण ते श्रेष्ठींचा खास माणूस होता असं म्हणतात" खराडे साहेब म्हणाले.
" त्याची काळजी तुम्ही करु नका..." गणेशराव त्याला आश्वासन देत म्हणाले.
" अन् सगळी माहिती एका कागदावर लिहून माझ्याकडे द्या ... मी बघतो काही करता येते का ते..." गणेशराव म्हणाले.
" म्हंजे .. श्रेंष्ठींकडे जाण्याची गरज नाय?" खराडे साहेब म्हणाले.
" तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर जाऊन या" गणेशराव नाराजीने तिथून निघून जात म्हणाले.
" नाय तसं नाय सायेब... " खराडे साहेब आता गणेशरावच्या मागे कुत्र जसं शेपूट हलवत मागे मागे फिरतं तसे जाऊ लागले.

क्रमश:...
This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

  1. HYA POST MADHE KHUP DHAKKE DILE BAPRE MAST POST HOTI ZAKAS

    ReplyDelete
  2. where is the your new story sir...

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network