Ch-49: मिटींग (शून्य- कादंबरी )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

बोर्ड रूममध्ये बॉस, सॅम, डॅन आणि इतर बरेच पोलीस अधिकारी जमले होते. जॉन सगळ्यांच्या समोर एका जागी बसला होता. सगळे जण आता तो काय सांगतो हे ऐकण्यासाठी उत्सुक होते. बॉसला तो काय सांगतो ते एकण्यात विशेष स्वारस्य दिसत नव्हते.

जॉनने सुरवात केली.

" हा जो खुनी आहे तो सिरीयल किलर आहे यात कुणालाच शंका नसावी"

जॉनने सर्वांंवर एक नजर फिरविली.

" मला वाटतं आपण सरळ मूळ मुद्द्यालाच हात घातल्यास बरं होईल" बॉसने टोमणा मारला.

जॉनला बॉसचं असं मध्ये बोलणं आवडलेलं नव्हतं. त्याला त्याचा राग आला होता. पण आपला राग गिळून चेहऱ्यावर तसे काहीही न दाखविता जॉनने फक्त एक नेत्रकटाक्ष बॉसकडे टाकला.

" हे बघा, खुन्यानं पहिला खून केला त्या इसमाचं नाव होतं सानी , दुसरीच हुयाना, तिसरीचं उटीना आणि आता चवथा ज्याचा खून झाला त्याचं नाव होतं नियोल"

जॉनने पुन्हा एकवार बॉसला टाळून सर्वांंवर नजर फिरविली.

" आणि आता पाचवा खून ज्याचा होणार आहे त्याचं नाव 'वाय' या अक्षराने सुरू होणारं आहे." जॉन एखादा सस्पेन्स उघड करावा या आविर्भावाने म्हणाला.

बॉसची उत्सुकता चाळवली गेली होती पण त्याने उघड आपल्या चेहऱ्यावर कोणताही भाव येऊ दिला नाही.

" हे तू कसं काय सांगू शकतोस?" कुणीतरी मुद्दा उपस्थित केला.

" सांगतो" जॉन एक दीर्र्घ श्वास घेत म्हणाला.

आता सर्व जण अजून एकाग्र होऊन लक्ष एकवटून एकू लागले.

" प्रत्येक खुनाच्या वेळी खुन्यानं आपल्याला 'क्लू' देण्याचा प्रयत्न केला होता. त्या सगळ्या क्लू मध्ये एक कॉमन मुद्दा होता तो म्हणजे झीरो आणि आता चवथ्या खुनाच्या वेळी त्याने भिंतीवर लिहिलेले होते

'झीरोचा शोध कुणी लावला?'

...आणि यातच पुढच्या खुनाचं रहस्य दडलेलं आहे तसा झीरोचा शोध कुणी लावला हा वादग्रस्त मुद्दा आहे..."

जॉन झीरोच्या शोधाबद्दल बोर्डरूममध्ये जमलेल्या सर्वांंना यथोचित माहिती देत होता. आणि सर्वजण लक्ष देऊन एकत होते. त्यातच डॅनची चुळबूळ सुरू झाली होती. तो बोर्डरूममधून बाहेर जाण्याच्या संधीची वाट पाहू लागला...


...जगाच्या इतिहासात शून्याच्या शोधाला फार महत्व आहे. शून्याच्या शोधाने गणिताला एक परिपूर्णता दिली होती. शून्याला एक आकडा म्हणूनच नाही तर एक कॉन्सेप्ट म्हणूनही फार महत्व आहे. आताही विज्ञानात अशी बरीच कोडी आहेत की ती शून्याच्या अभावी आणि परिणामी 'अगणित' (infinity) या संज्ञेच्या अभावी सोडवली गेलीच नसती. शून्याचा शोध कुणी लावला यावर बराच संभ्रम आणि वाद अस्तित्वात आहे. पण हेही तेवढेच सत्य आहे की अमेरिका आणि युरोप सारख्या ज्या भागाला आजच्या परिस्थितीत जगात सर्वात प्रगत भाग समजले जाते तिथे शून्याच्या शोध लागला नव्हता. तिथे बाकीच्या शोधांप्रमाणेच शून्याला सुध्दा सोईस्कररित्या 'इंम्पोर्ट' केले गेले होते. एवढेच नाही तर युरोप आणि अमेरिकेमध्ये जी रोमन अंकपध्दती सुरवातीला वापरली जात होती ती फारच अपरिपूर्ण आणि तोकडी होती. कारण त्या पध्दतीमध्ये अंकाला त्याच्या जागेप्रमाणे महत्व किंवा व्हॅल्यू नसल्यामुळे त्या अंक पध्दतीमध्ये गणितातले बेसीक बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार सुध्दा व्यवस्थित आणि जलद केले जाऊ शकत नाहीत.

आता शून्याच्याच बाबतीत बोलायचे झाल्यास एक मान्यता अशी आहे की शून्याचा शोध सर्वप्रथम भारतामध्ये लागला. 1 ही प्राकृतिक पहिली संख्या आहे. 1 नंतर क्रमाने येणाऱ्या प्राकृतिक संख्या या.. 2,3,4,5,6 ... इत्यादि आहेत. या संख्यांना काही अंत नाही. 1 मध्ये 1 चा योग केल्यास 2 येते. 2 मध्ये 1 चा योग केल्यास 3 येते. 3 मध्ये 1 चा आणि 4 मध्ये 1 चा योग केल्यास क्रमश: 4 आणि 5 येते. अशाच प्रकारे 6,7,8... इत्यादि संख्या येतील. योग या क्रियेच्या विरुध्द क्रियेस व्यवकलन म्हणतात. 5 मधून 1 चे व्यवकलन केल्यास 4 प्राप्त होतो, 4 मधून 1, 3 मधून 1 आणि 2 मधून 1 चे व्यवकलन केल्यास 3,2,1 असे क्रमश: प्राप्त होतात. पण आता प्रश्न पडतो की 1 मधून 1 चे व्यवलोकन केल्यास काय प्राप्त होईल? हा प्रश्न सर्व प्रथम भारतीय ऋषींच्या डोक्यात आला. 1 मधून 1 चे व्यवलोकन केल्यास रिक्तता उत्पन्न होते, आणि त्याला 0 च्या स्वरूपात लिहिले जाते. शून्याचा संख्येच्या स्वरूपात कोणी उपयोग केला हे सांगणे जरी कठीण असले तरी एवढी माहिती मिळते की ई.पू. दुसऱ्या शताब्दीत यूनानचे जोतिषी शून्यासाठी 0 चा उपयोग करायचे. परंतू ते लोकसुध्दा त्याच अर्थाने त्याचा उपयोग करायचे ज्या अर्थाने बॅबीलॉनीयन लोक उपयोग करायचे. 200 ई.पू. आचार्य पिंगल यांच्या छन्द: सूत्रात शून्याचा वापर सापडतो. भक्षाली पाण्डूलिपित (300 ई.) शून्य चिन्हाचा (0) प्रयोग करून संख्या लिहिलेल्या सापडतात. या ग्रंथाच्या 22व्या पानावर शून्य चिन्ह (0) आढळते. शून्याचे सर्वात प्राचीन चिन्ह आहे (.).

शून्याचा शोधच नाही तर एकूण बीजगणित, भूमिती या सगळ्यांवर आर्यभट्ट् नावाच्या गणितशास्त्रज्ञाच्या काळामध्ये बरंच कार्य झालं. पण ते सर्व कार्य संस्कृतात सूत्राच्या स्वरूपात लेखनबध्द झाल्यामुळे ज्यांना संस्कृत येत नाही त्यांना ते कळू शकलं नाही. कालांतराने भारतातच ते पाठांतराद्वारे पिढ्या दर पिढ्या जोपासलं गेलं. शून्याच्या शोधाचं मूळ भारतीय इतिहासातल्या वैदिक काळात वेगवेगळ्या स्वरूपात आढळतं. सगळ्यात पहिला कुणीही नाकारू शकणार नाही असा पुरावा म्हणजे ग्वाल्हेरला एका जागी संवत 933 मध्ये कोरलेल्या काही संख्या सापडल्या. तिथे एका जागी 50 हारांचा उल्लेख आहे आणि 270 ही संख्या हिंदी अंकाचा उपयोग करून लिहिलेली आहे. इथे शून्याचा संख्याच नाही तर प्लेस होल्डर म्हणून सुध्दा उपयोग केला आहे.

जगाच्या इतिहासात बह्मगुप्त हे पहिले गणिततज्ञ आहेत की ज्यांनी नॅचरल नंबर्स आणि झीरोवर वेगवेगळ्या गणित प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला होता. आणखी काही संस्कृतींनी उदा. बॅबीलॉनीयन लोकांनीसुध्दा एक चिन्ह शून्यासाठी प्लेसहोल्डर आणि एक संख्या म्हणून वापरले होते. पण एका विचारप्रवाहाच्या मानण्याप्रमाणे जगाच्या इतिहासात भारतीय संस्कृतीमध्येच सर्वात प्रथम झीरोचा एक संख्या, एक प्लेस होल्डर आणि एक संकल्पना म्हणून वापर झालेला होता. त्या अंकाचा , त्या प्लेस होल्डरचा आणि संकल्पनेचा उल्लेख भारतीय वेदीक साहित्यात 'शून्य' असा आढळतो...


....जॉनने बोर्डरूममधल्या सगळ्यांना झीरोच्या शोधाचा थोडक्यात आढावा आणि इतिहास सांगितला.

" आणि या झीरोतच खुनाचं रहस्य दडलेलं आहे. भारतीय इतिहासात जागोजागी झीरोचा उल्लेख 'शून्य' असा केलेला आढळतो"

जॉनने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे बोलायला लागला.

" पहिला खून झाला त्याचं नाव सानी म्हणजे ते 'एस' (S) य्ाा अक्षराने सुरू होते. दुसरा खून झाला तिचं नाव हूयाना म्हणजे ते 'एच' (H) या अक्षराने सुरू होते. तिसरा खून झाला तिचं नाव उटीना जे 'यू' (U) या अक्षराने सुरू होते आणि शेवटचा ज्याचा खून झाला त्याचं नाव नियोल जे 'एन' (N) या अक्षराने सुरू होते म्हणजे 'एस् एच् यू एन वाय ए' (SHUNYA) 'शून्य' म्हणजे आता जो खून होणार आहे त्याचं नाव 'वाय' (Y) या अक्षरानेच सुरू होणार यात वादच नाही"

जॉनने केलेल्या अचूक विश्लेषणामूळे सगळे जण त्याच्याकडे कौतुकाने बघायला लागले. अगदी बॉससुध्दा.

" पण या शहरात ज्यांचं नाव 'वाय' (Y) या अक्षराने सुरू होते असे हजारो किंबहुना लाखो लोक असतील. आता काय आपण त्या सगळ्यांना प्रोटेक्शन देणार?" बॉसने आपली शंका व्यक्त केली.

" इतक्या लोकांना संरक्षण देणे म्हणजे जवळ जवळ अशक्य !" सॅम म्हणाला.

" नाही अजून एक गोष्ट मला या सगळ्या प्रकरणात प्रकर्षाने जाणवली आहे... त्यामुळं आपला लोकांचा आवाका नॅरो डाऊन होणार आहे" जॉन म्हणाला.

अजून एक आशेचा किरण दिसल्यासारखे सगळे जण उत्सुकतेने जॉनकडे बघायला लागले. मग जॉन आपल्या खुर्चीवरून उठला आणि समोर भिंतीवर टांगलेल्या शहराच्या नकाशाजवळ गेला. त्याने आपल्यासमोरील काही कागद सुध्दा सोबत नेले होते. मग जवळच्या कागदाकडे बघत त्याने समोरच्या नकाशावर लाल स्केच पेनने एक फुली मारली.

" पहिला खून झालेल्या सानीचे घर शहरात जवळपास इथे आहे"

सगळे जण जॉनला काय म्हणायचे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले.

जॉनने आपल्याजवळच्या कागदाचा आणि समोरच्या नकाशाचा ताळमेळ बसवीत अजून एक लाल फुली नकाशावर मारली.

" दुसरा खून झालेल्या हूयानेचे घर हे इथे कुठेतरी आहे"

त्याने अजून एक लाल फुली नकाशावर मारीत म्हटले,

" तिसरा खून उटिनाचा झाला आणि तिचे घर या इथे आहे"

" आणि शेवटचा खून नियोल त्याचं घर"

जॉनने पुन्हा एकदा आपल्याजवळच्या कागदांचा आणि नकाशाचा तालमेळ बसवित अजून एक लाल फुली मारली आणि म्हटले , " हे इथं आहे "

सगळ्यांच्या चेहऱ्यांवर अजूनही प्रश्नचिन्हच होती.

" पण याने काय सिध्द होणार?" सॅमने प्रश्न उपस्थित केला.

" म्हणजे .....तुला काय म्हणायचे आहे हे एकतर तुलाच कळत नाही ... किंवा आमच्या पूर्णपणे डोक्यावरून जात आहे " बॉस म्हणाला.

" जरा लक्षपूर्वक बघा .... विचार करा... तुमच्या काही लक्षात येते का ते ?"

जॉनने एकदा बोर्डरूममधल्या सगळ्यांकडे एक दृष्टीक्षेप टाकला.

बराच वेळ शांतता होती. सगळे जण त्यातून काही सिध्द होते का ते पाहू लागले.

मग जॉनने समोरच्या नकाशावर हिरवे ठिपके ठिपके देत सगळ्या लाल फुल्यावरून जाणारी एक वक्र रेषा काढली. ती वक्र रेषा जिथून काढली होती मग तिथे नेवून पुन्हा जोडली. मग त्या ठिपक्यांवरून त्याने एक व्यवस्थित हिरवी ठळक रेषा काढली. आणि काय आश्चर्य त्या नकाशावर तंतोतंत एक वर्तुळ दिसू लागले.

"हे बघा हे काय निघाले"

" वर्तुळ" एकजण म्हणाला.

" वर्तुळ नाही... हे शून्य आहे" जॉन गूढार्थाने म्हणाला.

समोरच्या सगळ्याजणांच्या चेहऱ्यावर सगळं काही उलगडल्याचे आनंदयुक्त आणि उत्साहपूर्ण भाव पसरले.

" यस्स... यू आर जिनीयस जॉन" सॅमच्या तोंडातून उत्साहाने निघाले.

बॉसने नाराजीने सॅमकडे बघितले.

" पहिली फुली इथे , दुसरी इथे , तिसरी ही आणि चौथी ही ."

जॉन नकाशावरच्या फुल्यांकडे निर्देश करीत म्हणाला.

" म्हणजे पाचवी फुली जवळपास इथे कुठंतरी असायला पाहिजे"

जॉनने वर्तूळावर चौथ्या आणि पहिल्या फुलीच्या मध्ये जी रिकामी जागा होती तिथेे एक पाचवी लाल फुली काढली.

" या पाचव्या फुलीच्या एरियातच खुन्याचा पुढचा व्हीक्टीम दडलेला आहे आणि त्याचे नाव 'वाय'(Y) या अक्षरापासून सुरू होते. या दोन माहिती तंतोतंत जुळणारे साधारण तीन किंवा चार घरं असतील आणि ती सुध्दा पॉसीब्ली दहाव्या माळ्यावर ... कारण प्रत्येक खुनाच्या वेळी खुन्याने दहावा माळाच निवडला आहे"

" यस ....या घरांवर जर पाळत ठेवली तर खुन्याला आपण निश्चित पकडू शकू" उत्साहाने सॅम म्हणाला.

तेवढ्यात शिपाई आत येऊन बॉसच्या कानाशी म्हणाला,

" साहेब , तुमचा अर्जंंट फोन आहे"

बॉस खुर्चीवरून उठला.

" यू कॅरी ऑन. आय वील बॅक सून" बॉस जॉनला आणि बाकी जणांना म्हणत खाड खाड बुटांचा आवाज करीत बोर्डरूममधून बाहेर निघून गेला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

  1. Kadambari vachtana "Manoranjana" barobar thoda Shunyacha shodabaddal "Dnyan" sudha milal.

    ReplyDelete
  2. kharach vakya rachana apratim aahe

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network