Marathi literature - Madhurani : CH -21

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathi literature - Madhurani : CH -21


Always bear in mind that your own resolution to succeed is more important than any other.

-- Abraham Lincon


गणेश बाजारात दूतर्फा लावलेल्या दूकानाकडे पाहत फिरु लागला. डोक्यावर मे महिन्याचं रणरणतं ऊन असतांना लोक हिरवागार भाजीपाला, पिकलेले आंबे, कांदे, लसून घेऊन बाजारात दूकानं लावून बसलेले होते. कुणी किराण्याचं दुकान लावून बसले होते तर कुणी नुसत्या धान्याचे, जसे गहू, ज्वारी, तांदूळ असे दुकानं लावून बसलेले होते. आज जास्त इकडे तिकडे न फिरता गणेश सरळ बंडू हॉटेलवाल्याच्या पालाकडे गेला. जाड ताडपत्रीच्या बांबू, दोऱ्या आणि लोखंडाचे गज ठोकून बनविलेल्या शेडला ती लोक 'पाल' म्हणत असत. बंडूकडे गरमागरम भजे, आलूवडे, डाळवडे, मिरच्या घातलेले भजे, शेव, चिवडा, बुंदी, जिलेबी इत्यादि खान्याची जिन्नसं मिळत. तळणाचा खमंग वास, गरम गरम तेलाचा मनाला भूरळ घालणारा आवाज, आणि समोर ताटात ठेवलेली ती खान्याची पिवळी, काही लाल अशी लोभस जिन्नसं. पालासमोरुन गेला अन् त्याच्या तोंडाला पाणी सुटलं नाही असं क्वचितच होत असे. आलूवड्याला ती लोक 'आलूबोंडा' म्हणत. बंडूच्या हॉटेलवरचा आलूबोंडा गणेशला फार आवडायचा.

" या सायेब... माझ्याइथल्या आलूबोंड्यासारखा आलूबोंडा तुमास्नी कुठबी मिळणार नाय.... माही आलूबोंडा बनवायची तऱ्हाच लय न्यारी हाय... " म्हणत त्याने आलूचा बनविलेला गोळा पातळ बेसनात बुडवून भट्टीवर ठेवलेल्या कढईत उकळत्या गरम तेलात सोडला. मग दुसरा, तिसरा... असे कढईभर आलूवडे झाल्यावर त्याने आपला बेसनाने माखलेला हात बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात घुसळून धूतला. त्या ओल्या हाताचे शिंतोडे मग त्याने आलूवडे तळल्या जात असलेल्या कढईत शिंपडले. 'तड् तड्' असा आवाज आला. हे सगळं बघायला गणेशला फार मजा वाटत असे.

" बसानं सायेब ... बसा"

गणेश पालाच्या आत पाल उडू नये म्हणून ठेवलेल्या एका दगडावर बसला. वडे होण्याची वाट पाहत तो त्या तळल्या जाणाऱ्या वड्यांकडे बघू लागला.

बंडू हॉटेलवाल्याच्या सोबत पालात त्याची बायको मदतनीस म्हणून होती. जेव्हा हा तळण काढायचा तेव्हा ती बाकीचे गिऱ्हाईक सांभाळायची. आणि जेव्हा ती तळण काढायची, तो गिऱ्हाईक सांभाळायचा.

गणेशला कुणीतरी सांगितले होते की बंडू हॉटेलवाल्याने दोन लग्न केली होती. एक बायको घर, लेकरं बाळं सांभाळायची आणि दूसरी बायको त्याच्यासोबत त्याची मदतनीस म्हणून हॉटेलसोबत गावोगाव फिरायची. ... कधी कुठे जत्रेला, दुसऱ्या गावच्या बाजाराला ते खेडोपाडी फिरुन तिथे पाल लावायचे. पंधरा दिवस एका बायकोला घेऊन फिरला की तो तिला घर आणि लेकरं बाळं सांभाळायला घरी ठेवायचा आणि पुढचे पंधरा दिवस दूसरीला घेऊन गावोगाव फिरायचा. आपल्या धंद्यानुसार त्याने आपलं जीवन कसं ऍडजेस्ट केलं होतं. तसा तो हिशोबी होता. त्याचा हिशोबीपणा त्याच्या या दोन लग्न करण्यातही दिसून येत होता. दुसरं लग्न करून एक्स्ट्रा बायको तं बायकोही मिळाली होती आणि बिनपगारी मदतनीस, तीही विश्वासाची.

एव्हाना वडे पूर्णपणे तळले होते. बंडू तळलेले वडे बाहेर काढून एका मोठ्या ताटात टाकू लागला.

" दुसरे हॉटेलवाले ... हे असे वडे तुमाला खायला देतील... पर हे झालं आर्ध काम ..."

तो उरलेले कढईतले वडे ताटात टाकत म्हणाला.

" आता पुढचं काम म्हंजी ... या परतेक आलूबोंड्याच्या एक एक थोबाडीत मारायची ... या झाऱ्यानं अशी... "

तो त्याच्या हातातला झाऱ्या प्रत्येक वड्यावर आपटत म्हणाला.

जसा जसा तो झाऱ्या तो त्या वड्यांवर आपटत असे तसे तसे ते वडे फुटत आणि उलत.

" अन्् मंग पुन्हा यास्नी तेलात टाकायचं ... आसं..."

पुन्हा मग फुटलेले आणि उललेले वडे तेलात टाकत तो म्हणाला.

" अवो हीच तर खरी आलूबोंडे बनवायची तऱ्हा... ही आमी .... आमच्या बापूपासून ... आमचा बापू... आमच्या आबापासून.... अन् आबा... पंजोबापासून... असं पीढ्या दर पीढ्या ही तऱ्हा आमी शीकत आलो..."

ही बंडूची बडबड प्रत्येक वेळी वडे खायला आल्यावर गणेशलाच नाही तर प्रत्येक वडे खाण्यासाठी आलेल्या गिऱ्हाईकांना ऐकावी लागत असे. पण सगळे जण त्या वड्यांच्या आवडीपोटी त्याची ही बाष्कळ बडबड ऐकून घेत असत.

तो पुन्हा तेलात टाकलेले वडे हातातल्या झाऱ्याने हलवीत होता. मध्ये मध्ये उगीच बाजूच्या पाण्याच्या भांड्यात हात बुडवून त्या ओल्या हाताचे शिंतोडे तो त्या गरम तेलाच्या कढईत शिंपडायचा. त्यामुळे 'तड् .. तड्' असा आवाज येत असे. आणि तसा 'तड् .. तड्' आवाज करण्याची जणू त्याला सवयच झाली होती. कदाचित एवढ्या उन्हा तान्हात... तापणाऱ्या भट्टीसमोर तेवढ्याच उत्साहाने नेहमी काम करण्याचे रहस्य त्या 'तड्.. तड्' होणाऱ्या आवाजात दडले असावे असे गणेशला नेहमीच वाटत आले होते.


क्रमश:..


Always bear in mind that your own resolution to succeed is more important than any other.

-- Abraham Lincon

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

  1. tondala pani suttay vaddyancha evdha chan varnan aikun :) :)

    ReplyDelete
  2. khrach maza pn tondala pani sutlay ata

    ReplyDelete

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network