Marathi Novel books - Madhurani - CH-20 आठवडी बाजार

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

It is better to light a candle than to curse the darkness

-- Anonymous

आज गुरुवार असल्यामुळे आठवडी बाजार होता. सकाळपासूनच रस्त्यावर गर्दी आणि वातावरणात एक उत्साह भरलेला जाणवत होता. उजनीला आठवडी बाजाराच्या निमित्ताने आजूबाजूच्या खेड्यापाड्याचे लोक येत. गणेश सकाळी आपली अंघोळ वगैरे आटोपून ऑफीसकडे निघाला. आज आठवडी बाजार असल्यामुळे आजूबाजूच्या खेड्यातील लोकसुध्दा त्याच्याकडे येणार होते. म्हणजे रोजच्यापेक्षा कामाचा ताण आज जास्त राहाणार होता. म्हणून तो खोलीवरून लवकरच बाहेर पडला होता. जातांना त्याने एक नेत्रकटाक्ष मधुराणीच्या दूकानाकडे टाकला. तिनेही प्रतिसाद दिला - एक गोड स्माईल देऊन. ऑफीसकडे जाणारी त्याची पावले आपसूकच तिच्या दूकानाकडे वळली. आत्ताच ती दूकान उघडून बसली होती. दूकानात दुसरं कुणी गिऱ्हाईक नव्हतं. आणि तीचा नोकरही आला नव्हता. किंवा तिने त्याला कुठे दूसरीकडे पाठवले असावे.

" या गणेश " 'गणेश' या संबोधनावर जोर देत ती म्हणाली.

तिने 'गणेश' हे थोडं हळू आणि अडखळत संबोधलं होतं.

तिने पहिल्यांदाच गणेशला 'गणेश' असं एकेरी संबोधलं होतं. एरवी ती त्याला 'गणेशराव' असं संबोधायची.

गणेशच्या हृदयाची स्पंदनं वाढली.

" काय देऊ? ... बोला"

'काय देऊ' हे ती एका विशिष्ट अर्थाने आणि विशिष्ट शैलीने बोलल्यासारखी बोलली.

गणेश गोंधळून गेला. त्याचं ह्रदय जोरजोराने धडधडायला लागलं. चेहरा लाल व्हायला लागला होता. त्याने इकडे तिकडे पाहिलं. त्याला काय करावे काही सुचेना. दूकानावर जरी कुणी नव्हतं. तरी रस्त्यावरून बाजाराकडे जाणारे लोक दिसत होते.

" सिगारेट द्या " तो कसाबसा बोलला.

" द्या?" तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.

तिची भेदक नजर त्याला खुणावत होती.

" म्हणजे दे.." त्याने हिम्मत करून कसेतरी तिला एकेरी संबोधले.

तिने एक सिगारेट काढून त्याच्या हातावर ठेवली.

त्याने सिगारेट आपल्या हातात घेण्याच्या निमित्ताने तिचा हातही आपल्या हातात घेतला. तिने लाजून मान खाली घालून आपला हात नम्रपणे त्याच्या हातातून सोडवून घेतला.

तेवढ्यात तिथे एक गिऱ्हाईक आले. गणेश अवघडलेल्या स्थितीत उभे राहून त्या गिऱ्हाईकाच्या जाण्याची वाट पाहू लागला. त्या गिऱ्हाईकाने काहीतरी खरेदी केले आणि तो जाऊ लागला. गणेशला हायसं वाटलं. पण लागलीच दुसरं गिऱ्हाईक आलं. आणि त्यामागून तिसरं. असा गिऱ्हाईकाचा मग ओघच सुरु झाला.

" बरं येतो... " त्याच्या तोंडात आलेलं 'राणी' हे संबोधन मोठ्या मुश्कीलीने रोखत तो म्हणाला.

मधुराणी नुसती त्याच्याकडे पाहून हसली. तो वळून जड पावलांनी ऑफीसकडे निघाला.

गणेश ऑफीसमध्ये शिरला तेव्हा त्याच्या टेबलसमोर लोकांची बरीच गर्दी जमली होती. कुणाचे काही दाखले, कुणाच्या लोनकेससाठी कागदपत्र लागणार होते, तर कुणाला गव्हर्नमेंटने जाहिर केलेले अनुदान घेण्यासाठी काही कागदपत्रे हवी होती. गणेशने आल्याबरोबर सपाट्याने कामाला सुरवात केली. त्या कामाबरोबर मिळणाऱ्या वरच्या कमाईमुळे कदाचित त्याला काहीच कंटाळा जाणवत नव्हता. बाहेर ओटयावर पांडू पैसे जमा करण्यासाठी बसला होता. आधीही जेव्हा खराडे साहेब होते तेव्हाही तो हेच काम करत असे. तो लोक आत येण्याच्या आधीच त्यांच्याजवळून पैसे घेऊन एक चिठ्ठी त्यांच्याजवळ देत असे. पांडू जास्त शिकलेला नव्हता. जरी तो फक्त दुसरीच असला तरी पैसे घेऊन चिठ्ठी लिहिण्याचे काम चोख बजावत असे. पांडूला बाहेर बसविल्यामुळे गणेशची दोन कामे सोपी होत होती. एकतर पैसे प्रत्यक्ष घ्यावे लागत नसल्यामुळे लाचलूचपत खात्याची काही भीती नव्हती. तसे लाचलूचपत खाते इतक्या तडकाफडकी गावी येणार नाही याची त्याला जाणीव होती. पण नको दक्ष असलेले केव्हाही चांगले. गणेशला पांडूचा दुसरा फायदा असा होता की त्याला त्या लोकांना काय पाहिजे हे समजून घेण्यासाठी त्यांच्याशी जास्त चर्चा करावी लागत नसे. दिवसाच्या शेवटी गणेशही त्याला काही इनाम देत असे. त्या इनामाच्या लालचीवरच तर तो दिवसभर हे गणेशचे काम करीत असे.

गणेशच्या टेबलसमोर आता एकजणच उरला होता. त्याला एकट्याला पाहून गणेशने सुटकेचा एक उसासा टाकला आणि मग घड्याळाकडे बघितले. एक वाजत आला होता. सकाळपासून त्याला पाणी प्यायलासुध्दा उसंत भेटली नव्हती. आता त्याच्या पोटात कावळे ओरडणं सुरु झालं होतं. तहान लागून घसासुध्दा कोरडा झाला होता. त्याने विचार केला एवढ्या एका खेडूताला निपटवून बाहेर बाजारात एक चक्कर मारायची आणि जे भेटेल ते खायचे प्यायचे. तेवढ्यात बाहेरुन एक पोऱ्या आत आला. त्याच्या हातात पितळीचा एक ग्लास होता. त्याने काही न बोलता तो ग्लास गणेशच्या समोर ठेवला आणि काही न बोलता तो जायला निघाला.

" काय आहे रे?.." गणेशने त्या जाणाऱ्या पोराला विचारले.

" कोण जाणे?.." तो पोरगा खांदे उडवून म्हणाला.

" पांडूदानं पाठीवलं..." तो पुढे म्हणाला आणि निघून गेला.

गणेशने ग्लास हातात घेऊन प्रथम त्यात डोकावून बघितले आणि मग एक घोट घेतला. त्याला हायसं वाटलं. बाहेर ओट्यावर बसलेल्या पांडूने कुठूनतरी जूगाड जमवून थंडगार शरबताची व्यवस्था केली होती. शरबत बडीशोपीपासून बनविलेलं होतं. माठातल्या थंडगार पाण्यात साखर टाकायची आणि त्यात मग बारीक कुटून सोप घालायची. ते कापडातून गाळलं की झालं छान सोपेचं शरबत. गणेशने हे असं सोपीचं शरबत इथे उजनीतच प्रथम पीलं होतं. त्याला ते खूप आवडायचं. उरलेलं शरबत त्याने गटागटा पिवून घेतलं. त्याला तहानच तशी लागली होती.

आता गणेशने त्या उरलेल्या एकूलत्या एका जणाला बोलावले. तो एक खेड्यावरचा ऊंच च्या ऊंच 22 एक वर्षाचा पोरगा होता.

" काय पाहिजे? " गणेशनं विचारलं.

" बां न पाठवलं..." तो पोरगा म्हणाला.

" अरे हो तुझ्या बापानं पाठवलं... पण काय काम आहे ते तर सांगशील...?" गणेशने विचारले.

मग तो डोक्यावर जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करु लागला.

" बाहेर पांडूला भेटला का?" गणेशने विचारले.

" हो भेटलोकी..." तो म्हणाला.

" मग त्याने काही चिठ्ठी गिठ्ठी दिली असेल ना?"

" हो देली की" त्याने वरच्या खिशातून एक चुरगाळलेला कागद काढला आणि गणेशच्या हातात दिला.

"येडंच आहे..." गणेश चिडून म्हणाला.

गणेशने एकदा त्या चुरगाळलेल्या कागदाकडे पाहिले आणि मग आश्चर्याने त्याच्याकडे पाहले. गणेशने तो चुरगाळलेला कागद उकलला. गणेश त्या कागदावर काय लिहिले ते वाचण्याचा प्रयत्न केला पण तो कागद एवढा चुरगाळलेला होता की गणेशला ते वाचता येत नव्हते.

" तुला लिहिता वाचता येते का?"

" मंग येते की? " तो अभिमानाने म्हणाला.

" अच्छा ... तर जरा इकडून येऊन मला हे वाचून दाखव बरं ... या चिठ्ठीवर लिहिलेले.." गणेश अजूनही त्या कागदावर लिहिलेले वाचण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.

त्याने गणेशकडून जाण्यासाठी प्रथम कुठून रस्ता आहे ते बघितले. गणेशच्या समोर एकाला लागून एक असे तीन टेबल ठेवलेले होते आणि गणेश डाव्या कोपऱ्यात अगदी भिंतीला भिडून बसला होता. रस्ता तीन टेबल सोडून खोलीच्या एकदम उजव्या कोपऱ्यात भिंतीच्या बाजूला होता. मग त्याने गणेशच्या बाजूचा दुसरा टेबल सरकवून तिकडे जाण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याला काय वाटले कोणास ठावूक तो दुसऱ्या टेबलवरून त्याचा उंचच्या उंच पाय पलिकडे ठेवून त्या टेबलला ओलांडून गणेशच्या बाजूने गेला. गणेशने तो प्रकार बघितला. गणेश त्याच्याकडे नुसता आश्चर्यचकीत होऊन बघू लागला.

" अबे पागल आहेस का?" गणेश त्याला रागवण्यासाठी जोराने ओरडला पण दुसऱ्याच क्षणी त्या पोराच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आणि आधी त्याचा टेबल ओलांडण्याचा तो अजब प्रकार आठवून त्याला त्या पोराचे हसु आले.

" अबे काय एडा माणूस आहेस बे तू.. ते तिकडून रस्ता आहे ...तिकडून यायचं तर चक्क टेबल ओलांडून येतोस तू..." गणेश हसत हसत त्याला म्हणाला.

त्याला काय म्हणावे? हसावे की रागवावे? गणेशला काही सुचत नव्हते.

तो पर्यंत तो पोरगा टेबल ओलांडून गणेशच्या बाजूला उभा राहून वाकून त्या चिठ्ठीवर काय लिहिले ते वाचू लागला, " शेत वहितीचा दाखला"

क्रमश:..

It is better to light a candle than to curse the darkness

-- Anonymous

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network