Marathi library on net - Madhurani - CH 38 भिक्याला काय झालं?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

-->English literature link

Marathi library on net - Madhurani - CH 38 भिक्याला काय झालं?

एका घरा समोर लोकांनी गर्दी केली होती. जाता जाता गणेशने त्याच्यासोबत येणाऱ्या एका गावकऱ्याला विचारले.

"काय झालं?"

"कोण जाणे... भिक्याला कायतरी झालं म्हणत्यात..."

भिक्या मणजे मंडपवाला तर नाही? ...

नाही तो नसणार कारण ते घर तर दुसरंच कुणाचं तरी आहे...

गणेश झपाझप पावले टाकीत त्या घरासमोर गेला. गर्दीतून रस्ता काढत तो घरात शिरला. समोर ओसरीवर बसून भिक्या जोरजोराने ओरडत होता. मागून कंबरेत त्याला त्याच्या आडदांड दोन भावांनी गच्च पकडून धरलं होतं. पण तो त्या दोघांनाही आवरत नव्हता.

गणेशने अजून तिथे उभ्या असलेल्या एकाला विचारले " काय झालं?"

" काय माहित ... सकाळ उठल्यापासनं ते आसं करते .. येड लागल्यागत ... पाणी तेच्या समोर नेलं की तर आजूनच बिथरते..."

" म्हंजे पाण्याला भिते... म्हंजे पिसाळलं कुत्र डसलं आसन तेला" दुसरा एकजण म्हणाला.

तेवढ्यात डॉक्टरची बॅग घेऊन कुणीतरी आत आलं. मागोमाग डॉक्टर आले.

" ए बाजूला व्हा ... डाक्तर आले तेनला आत येऊ द्या..." कुणीतरी गर्दीला बाजूला करीत म्हणाले.

डाक्टर आत येऊन भिक्याजवळ जाऊन उभे राहाले. त्यांनी त्याच्या भावाला आणि घरातल्या इतर मंडळींना काही माहिती विचारली. बिचाऱ्या भिक्याची बायको अन् पाच वर्षाची छोटी मुलगी भेदरल्यागत झाले होते. त्यांनी भिक्याला अश्या अवस्थेत पूर्वी कधीच पाहिले नव्हते. त्याची बायको त्याच्या तोंडातून बाहेर येणारी लाळ पदराने पुसत होती. तर पोरगी " बा ... बा" करून रडत होती.

तेवढ्यात सरपंच आत आले. त्यांनी उगीच घरात गर्दी आणि गोंधळ करणाऱ्या लोकांना बाहेर पिटाळले. सरपंचाच्या एका शब्दाला मान होता. इतकावेळ इतर जण लोकांना ढकलून रागवून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते पण लोक दाद देत नव्हते. तेच सरपंचाच्या एका शब्दाने सगळे जण पटापट बाहेर पडले.

आता पाटीलही गडबडीने आत आले. पाटलांनीही याला इकडे पाठव त्याला तिकडे पाठव असं केलं.

डॉक्टरांनी भिक्याच्या मोठ्या भावाला, सरपंचाला आणि पाटलाला बाजूला घेतले. डॉक्टरांनी गणेशलाही हात करून तिथे बोलावून घेतले.

" ही पिसाळलं कुत्र चावल्याची केस हाय..." डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले.

" कधी चावलं होतं कुत्र याला " सरपंचाने भिक्याच्या भावाला विचारले.

" कोणाचं कुत्र होतं... " पाटील जसे ज्याचं असेल त्याला आपण बघून घेऊ अश्या अविर्भावात भिक्याच्या भावाला विचारू लागले.

" चावलं कशाचं ... एक दिस राती हे गर्मीनं कटाळून बाहेर रस्त्यावर बाज टाकून झोपलं... तव्हा एका कुत्र्याच्या टोळीचं भांडण झालं आन चारपाच कुत्रे बाजवून याच्या अंगावून गेली तव्हा एकाचं नख लागलं येला" भिक्याचा भाऊ म्हणाला.

" नखच कशावरून दातही असू शकतो"

त्याचा भाऊ काहीच बोलला नाही.

" मंग आता ..."

" मंग आता काय? ... येड्या तव्हाच इंजक्सन घ्यायची की ' कुणीतरी पटकेवाला प्रतिष्ठीत गावकरी म्हणाला.

" मी म्हणलो त्येला पर त्योच ऐकला नाय..."

सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे एका गर्भीत शांततेने पाहू लागले.

" मंग आता लावा की इंजक्सन तेला"

" आता वेळ निघून गेलेली हाय... आता काय उपयोग नाय त्याचा" डॉक्टर त्याच्या खांद्यावर हात ठेवून दिलासा देत त्याला म्हणाले.

" आसं कसं म्हंता डाक्तर आपण तेला तालूक्याच्या ठिकाणी घेऊन जाऊ " त्याचा भाऊ म्हणाला.

" हो तसं आसल तर आपली जीप कोणत्या कामाची मंग... ए किसना जारे ... आपल्या ड्रायवरला आपली जीप आणाया सांग" पाटील मध्येच बोलले.

" काय उपयोग होणार नाय " डॉक्टर निराशेने म्हणाले.

त्याच्या भावाचा चेहरा रडकुंडीला आला.

" आता तुच या घरात मोठा हायेस... जरा धीरानं वाग" सरपंच त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.

तो आपले अश्रू लपवीत लगबगीनं घरात गेला.

गणेशला त्याच्या बायकोपोरीची आगतीक स्थिती पाहून वाईट वाटत होतं. डॉक्टरांनी आपली बॅग एका कोपऱ्यात ठेवली आणि वाट पाहू लागले - भिक्याचा जीव जाण्याची . दुसरं तरी काय ते करु शकत होते. सरपंचाने एका बाईला भिक्याच्या बायको आणि पोरीला तिथून घेऊन जाण्यास सांगितले. पण प्रयत्न करूनही ते तिथून हलण्यास तयार नव्हते. मग सरपंचाने भिक्याच्या आईला कमीत कमी त्या पोरीला तरी बाजूला न्या असे सुचवले.

एवढ्यात आत गेलेला भिक्याचा भाऊ पुन्हा तरातरा बाहेर आला. डॉक्टरजवळ येऊन डोळे पुसत म्हणाला, " किती येळ हाय त्याच्याजवळ"

" जास्त नाय " डॉक्टर म्हणाले.

अचानक त्याच्या भावाला काय सुचले काय माहित तो तरातरा चालत घराच्या बाहेर पडायला लागला.

" आरं कुठ चालला" सरपंच म्हणाले

" येतो मी .. आत्ता येतोच" म्हणत तो घराच्या बाहेरसुध्दा पडला.

पुन्हा काही गावकरी मंडळी गर्दी करीत घरात घुसली होती त्यांना पाटलाने बाहेर काढले. भिक्याच्या आईला भिक्याच्या पोरीला बाजूला नेण्यात यश मिळाले होते. पण त्याची बायको तिथून हटायला तयार नव्हती.

इकडे बाजूला गणेश डॉक्टरसोबत चर्चा करीत होता तेवढ्यात त्यांना एकदम रडापडीचे आणि हंबरडा फोडण्याचे आवाज आले. गणेशने वळून भिक्याकडे पाहले. त्याची मान आपल्या बायकोच्या मिठीत एकीकडे ढूलकली होती. त्याचे प्राणपाखरु उडून गेले होते.

आता गर्दी कुणालाही न जुमानता घरात घुसत होती. बाकीच्या लोकांना भिक्याचे शेवटचे दर्शन देण्याची संधी मिळावी या हेतूने गणेश आणि डॉक्टर तिथून बाहेर पडू लागले. बाहेर पडता पडता त्यांची रस्त्यात भिक्याच्या भावाशी गाठ पडली. तो घाई घाईने रडवेला चेहरा करून घरात येत होता आणि त्याच्या सोबत गावातला वैदू होता. बिचाऱ्याने कदाचित त्या वैदूत आपली शेवटची आशा शोधण्याचा प्रयत्न केला असावा.

to be continued...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network