Marathi modern litearature - Madhurani - CH-49 झोप उडाली

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

 आज रात्री गणेशरावची झोप उडाली होती. ते कडावर कड बदलत होते. एकीकडे मधुराणीच्या त्या कोमल स्पर्शाने त्यांच्या जून्या आठवणींना उजाळा मिळाला होता. तर दुसरीकडे त्यांना दाराच्या फटीतून बघितलेले मधूकररावचे मधुराणीशी चाळे आणि त्यांच्यातला संवाद आठवत होता.
म्हणजे त्या मधूकररावमधे आणि मधुराणीत काहीतरी शिजत असावं ...
कि नुसतं जसं आपल्याला नादी लावलं होतं तसं त्यालाही?...
कदाचित तिला या गोष्टी तिच्या राजकारणाचा भाग म्हणून कराव्या लागत असाव्यात...
तसं तिचं मधुकरराववर प्रेम वैगेरे काही नसावं...
पण त्यांच्यात पाटलाबद्दल काहीतरी गूढ गोष्टी झाल्या...
त्याला त्यांच्यातलं एक एक वाक्य आठवायला लागलं
" तो पाटील आजकाल सर्व मर्यादा ओलांडू पाहत आहे...."
" आपलं कळलेलं दिसते त्याला..."
आपलं म्हणजे त्या दोघात काहीतरी शिजत असांव हे नक्की...
" कळलेलं म्हणजे... मी काय त्याला भिते होय... अन् मी काय त्याची बांधलेली रखेल होय...त्याचं लवकरात लवकर काहीतरी कर... नाहीतर जड जाईल तो आपल्याला "
म्हणजे पाटलाशी सुध्दा ... तर नाही मधुराणीचं काहीतरी....
कदाचित मधूकररावच्या आधी असावं...
" त्याची काही काळजी करु नको ... मी बंदोबस्त केला आहे..."
" प्रकरण जास्तच बिनसलेलं आहे... एकदोन दिवसातच काहीतरी करायला पाहिजे"
" एकदोन दिवस कशाला... उद्याचा सूर्य दिसणार नाय त्याला..."
म्हणजे तो पाटलाचा खून करणार की काय...
नाही नाही ... मधुराणी कशीही असली तरी या स्तराला जाणार नाही...
मग मधेच त्याला त्या दोघांतला संवाद आठवू लागला.
" गणेश ... असे इकडे येऊन बसा ..."
मधुराणीने कसाही आपला फायदा घेतला असला तरी कुठे पुसटशी का होईना अजूनही तिच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी नक्कीच असलं पाहिजे....
की अजून ती आपल्याला आपल्या जाळ्यात ओढू इच्छिते...
पण आता आपल्याला जाळ्यात ओढून आपल्यापासून काय मिळणार आहे तिला ...
अन् आता आपण पहिल्यासारखे तरुण सुध्दा नाही राहिलो...
मग काय झालं प्रेमाला वयाचं थोडीच बंधन असतं...
अन् माझं वय वाढलं म्हणून काय झालं ...
तिचंही तर वाढलेलंच आहेच ना...
" आजकाल पहिल्यासारखं नाही राहालं... आता तब्येत साथ देईनाशी झाली"
या वाक्यात मधुराणीची अगतिकता तर दिसत नव्हती ना...
अशा परिस्थितीत तिला कोणीतरी जीवलग असणं फार आवश्यक आहे...
तो ती आपल्यात तर शोधत नसावी? ...
" बघ बरं माझी नाडी बघ बरं... "
मधुराणीचं वाक्य गणेशच्या कानात घुमलं आणि त्याचं अंग अजूनही शहारलं.
खरंच अजूनही तिचा तोच हात ...
तसाच मुलायम स्पर्श...
" येत जा ... असंच अधून मधून... तेवढाच मागच्या आठवणींना उजळा" गणेशरावांना तिथून निघतांनाचे तिचे शब्द आठवले...
तिने आपल्याला काही इशारा तर नाही ना केला यातून...
नक्कीच नाहीतर ती एवढी मोठी आपल्याशी एवढी आपूलकीने का बोलली असती...
पण मग तो उपटसुंभ मधुकरराव कोण ...
तोही तर तिच्याशी चाळे करीत होता ...
आणि मधुराणीही त्याला प्रोत्साहनच देत होती...
कदाचित तो तिच्या शरीरावरच प्रेम करीत असावा...
किंवा काहीतरी पॉलीटीकल फायद्यासाठी ती त्याला आपल्या जाळ्यात ओढत असावी...
पण आपल्याशी तरी तीचे प्रेम निर्मळच वाटते...
एवढ्या बनवाबनविच्या जगात शेवटी माणसाला निर्मळ प्रेमाची आवश्यकता असतेच की...
कड बदलता बदलता कधी सकाळ झाली गणेशरावांना कळलंच नाही. त्यांच्या बायकोची सकाळी उठून कामाची खुडबुड सुरु झाली होती. त्यामुळे आता झोप येणं तर शक्यच नव्हतं. ते कॉटवरून उठले आणि खोलीत येरझारा घालू लागले. दरजावर थाप पडली तसं ते एकदम येरझारा घालण्याचे थांबले; समोरच्या खोलीत आले. तिथे त्यांचा मुलगा विण्या तोंड अर्धवट उघडं ठेवून ढाराढूर झोपलेला होता. गणेशरावने त्याच्याकडे एक कडवट नजर टाकत समोरचे दार उघडले. दारात पेपर पडलेला होता. गणेशरावने तो उचलला आणि दार ओढून घेत पेपर चाळत पुन्हा आत आले.
पेपरची हेडलाईन वाचतात गणेशरावच्या पोटात गोळा उठला.
" संपतराव पाटील - अपघातात मृत्यूमूखी"
काल तर आपण पाहिले होते त्यांना मधुराणीकडे...
अचानक गणेशला आठवले की मधुराणी आणि त्याच्यात काहीतरी वाद झाला होता.
मग त्याला मधुराणी आणि मधुराणीकडे आलेल्या त्या मधुकररावचा संवाद आठवायला लागला.
" तो पाटील आजकाल सर्व मर्यादा ओलांडू पाहत आहे...."
" आपलं कळलेलं दिसते त्याला..."
" कळलेलं म्हणजे... मी काय त्याल भिते होय... अन् मी काय त्याची बांधलेली रखेल होय...त्याचं लवकरात लवकर काहीतरी कर... नाहीतर जड जाईल तो आपल्याला "
" त्याची काही काळजी करु नको ... मी बंदोबस्त केला आहे..."
" प्रकरण जास्तच बिनसलेलं आहे... एकदोन दिवसातच काहीतरी करायला पाहिजे"
" एकदोन दिवस कशाला... उद्याचा सूर्य दिसणार नाय त्याला..."
गणेशरावला त्यांच्या कानावर घणाघण घाव होत आहेत तसा तो संवाद जसा च्या तसा आठवायला लागला.
अरे ... बापरे .. म्हणजे मधुकररावने खरंच की काय पाटलाचा काटा काढला...
की हा केवळ योगायोग...
नाही योगायोग कसला...
म्हणूनच तर नाही मधुराणी आपल्याशी गोड गोड वागत होती...
तिला खात्री असावी की आपण त्यांचा संवाद ऐकला...
गणेशराव मटकन कॉटवर बसले. त्यांच्या डोक्यात विचारांचं काहूर उठलं होतं. आणि सगळी कोडी जशी त्यांच्या डोक्यात सुटत चालली होती.
त्यांना मधुराणीचा इतिहास आठवायला लागला.
मधुराणीचा नवरा पाटलाच्या हातून अपघातात मारला गेला...
कदाचित मधुराणीनच पाटलाकरवी त्याचा काटा काढला असावा...
मग पाटलाचा वापर करून मधुराणीने आपल्या पॉलीटीकल महत्वाकांक्षा पूर्ण केल्या...
आणि मग तो जड चालला असं पाहून मधुकररावाच्या हस्ते पाटलाचासुध्दा काटा काढला...
म्हणजे तिचा नवरा, पाटील आणि आता मधुकरराव ह्या सगळ्या मधुराणीच्या नर मधमाश्या होत्या तर...
हो नर मधमाश्याच की ... जशी राणी मधमाशी तिच्या नर मधमाशीला त्यांच्या मिलनाच्या नंतर जीवे मारते तसंच तर तिच्या नवऱ्याला आणि पाटलाला तिनं मारलं होतं.... आता कदाचित कधीतरी मधुकररावचाही नंबर लागेल...
आणि ही गोष्ट फक्त आपल्यालाच माहित आहे...
म्हणजे दुसऱ्या खुनाची तरी ...
त्यांचा सर्व संवाद आपण ऐकलेला आहे...
आपण पोलीसात जायला पाहिजे का?....
पण आपल्या नुसत्या ऐकीव माहितीवर कोण विश्वास ठेवणार?...
आणि मधुराणी म्हणजे काही आता साधीसूधी हस्ती नाही...
तिच्याशी टक्कर घेणं म्हणजे आत्महत्याच केल्यासारखं नाही का?....
गणेशराव पुन्हा पुन्हा पेपरमधली बातमी वाचत होते.
" संध्याकाळी सातच्या दरम्यान संदिपराव पाटील मधुराणी सावंत यांच्या बंगल्यावरून, एक महत्वाची मिटींग आटोपून आपल्या गावी जायला निघाले होते. प्रवासाच्या दरम्यान रात्री आठच्या आसपास ते रस्त्यात एका धाब्यावर थांबले. तिथे त्यांनी मद्य सेवन केले आणि जेवण केले. मग पुढच्या प्रवासाच्या दरम्यान कदाचित मद्य सेवन केल्यामुळे त्यांच्या गाडीची टक्कर समोरुन भरधाव येणाऱ्या ट्रकसारख्या एखाद्या अवजड वाहनाला झाली असावी. कारण तो जडवाहन धारक आपले वाहन घेऊन तेव्हाच तिथून फरार झाला. पोलीस पथक त्या वाहनाच्या आणि ड्रायव्हरच्या शोधाचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. अपघातात संदिपराव पाटील यांचा जागीच मृत्यू झाला...."
गणेशराव पुन्हा विचार करु लागले.
नक्कीच हे एक मोठ कटकारस्थान आहे...
गणेशरावचं डोकं विचार करून नुसतं सुन्न झालं होतं.
क्रमश:...


This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network