Novel on net - Madurani CH-48 मधू

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Novel on net - Madurani CH-48 मधू

गणेशराव खोलीच्या बाहेर आले. गणेशरावच्या डोक्यात अजूनही मधुराणीबद्दलची कृतज्ञता होती.
आतला गालीच्या तर बाहेच्यापेक्षाही अगदी मऊ आहे...
त्यावरून चालतांना कसं अगदी ढगावरून चालल्यासारखं वाटतं...
गणेशरावांना त्या गालीच्यांवरून आणि बंगल्यात ठेवलेल्या इतर किमती सामानावर मधुराणीची समृध्दता जाणवत होती. गणेशरावांना त्याचा एकाच वेळी हेवा आणि अभिमानही वाटत होता.
खरंच मधुराणीने अगदी थोड्या कालावधीतच नेत्रदिपक प्रगती केली होती...
ती आपल्याशी कशीही वागो पण तिच्या कर्तबगारीला मानावेच लागेल...
तेवढ्यात समोरचं दार उघडून एक उंचापुरा, तगडा, पांढरे लिडरसारखे कपडे घातलेला मनुष्य आत आला.
अरे हे तर मघाशी बाहेर दिसलेले मधुकरावच आहेत...
मधुकरराव गणेशरावसमोरुन जाऊ लागले. गणेशरावने त्यांच्याकडे बघितलं. पण एक तर त्याचं लक्ष नसावंं किंवा त्यांनी गणेशरावकडे दुर्लक्ष केलं असावं.
बाहेर तो माणूस म्हणत होता ते काही खोटं नसावं....
मधुराणीचा अगदी खास माणूस दिसतो...
तेवढ्यात मधुकरराव मधुराणीच्या खोलीचे दार उघडून बेधडक आत गेले.
हो नक्कीच खास माणूस असावा ...
नाहीतर असा बेधडक आत कसा काय शिरला असता?...
गणेशराव समोरच्या दाराकडे चालू लागले. अचानक ते ब्रेक लागल्यागत तिथे थांबले.
अरे विण्याच्या नोकरीचं सांगायचं तर विसरुनच गेलो...
आता कसं करायचं?...
अजून आपण पुरते बाहेर थोडीच पडलो आहोत...
परत जाऊन सांगायला पाहिजे...
नाहीतर इथून का बाहेर पडलो...
तर पुन्हा दिवसभर हॉलमध्ये थांबनं आलं...
आणि तो विन्या घरी गेल्यावर किती बोंबलणार..
गणेशराव ताबडतोब वळले. परत जाऊन मधुराणीच्या खोलीच्या बंद दरवाज्याजवळ थांबले.
आता जावं की थोडं थांबावं?...
दार तिरकं करून बघायला पाहिजे...
गणेशरावांनी हळूच ढकलून दार तिरकं केलं. आतले दृष्य पाहून तर गणेशरावचे होशहवासच उडून गेले. समोर सोफ्यावर आता आत गेलेला तो माणूस मधुकरराव मधुराणीला रेटून बसला होता आणि तो तिच्या चेहऱ्यावर घरंगळणाऱ्या केसांच्या बटांशी खेळत होता.
गणेशरावांनी पटकन तिरकं केलेलं दार सोडून दिलं. पण हे काय ते दार बंद न होता तसंच तिरकं उघडं राहालं. दारात काहीतरी अडकलं असावं. गणेशराव संभ्रमात पडलेल्या अवस्थेत तिथे तसेच थांबले. आतलं अजूनही स्पष्ट दिसत होतं आणि आतून मधुराणीचं आणि त्या माणसाचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं
" मधू ... हे इथे..." मधुकररावने एक कागद आणि शाईचं पॅड मधुराणीच्या समोर धरलं...
" हे काय आहे..."
" आता काय माझ्यावर विश्वास नाही राहाला होय... मी काय तुला फसवणार आहे... त्या दिवशीच्या कारखान्याच्या खरेदीचे कागदपत्र आहेत... "
" तसं नाही रे ... सोन्या... " ती त्याचा गालगुच्चा घेत म्हणाली.
गणेशरावला आता त्यांच्या हातापायात कंप जाणवू लागला.
नाही ... नाही ... आता आपण इथे थांबणं योग्य नव्हे...
त्यांचं जर आपल्याकडे लक्ष गेलं तर?...
पण त्यांचा पाय तिथून निघत नव्हता.
मधुराणीने मधुकररावने तिच्या पुढ्यात धरलेल्या शाईच्या पॅडमध्ये आपला डावा अंगठा बुडवला आणि आपल्या पुढ्यात धरलेल्या कागदपत्रावर एका जागी लावला.
गणेशरावचा विश्वासच बसत नव्हता. इतके दिवस तिच्या सानिध्यात राहून त्याना आज पहिल्यांदाच कळले होते की मधुराणी ठार अशिक्षीत आहे म्हणून.
बापरे म्हणजे मधुराणी एखादी गोष्ट किती सफाईने लपवू शकते...
" त्या पाटलाच्या आजकाल मर्यादा वाढल्या आहेत..." मधुराणी मधुकररावला म्हणाली
" आपलं कळलेलं दिसते त्याला..." मधुकरराव डोळे मिचकत हसत म्हणाला.
" कळलेलं म्हणजे... मी काय त्याला भिते होय... अन् मी काय त्याची बांधलेली रखेल होय...त्याचं लवकरात लवकर काहीतरी कर... नाहीतर जड जाईल तो आपल्याला "
" त्याची काही काळजी करु नको ... मी बंदोबस्त केला आहे..."
" प्रकरण जास्तच बिनसलेलं आहे... एकदोन दिवसातच काहीतरी करायला पाहिजे"
" एकदोन दिवस कशाला... उद्याचा सूर्य दिसणार नाय त्याला..."
" गुड बॉय... " मधुराणीने त्याचा अजून एक गालगुच्चा घेतला.
" याच तर तुझ्या मर्दानगीवर मी फिदा आहे ... समजलं...." ती त्याच्याकडे अभिमानाने पाहत म्हणाली.
" अन् मी तुझ्या कशावर फिदा आहे माहित आहे..."
मधुराणीने नटखट डोळ्याने स्मित हास्य करीत त्याच्या डोळ्यात पाहिलं...
" तुझ्या ह्या अश्या पाहण्यावर..."
गणेशराव आता सावरले होते. ते गर्रकन वळले आणि तिथून निघून जाऊ लागले.
" कोण आहे तिकडे?" मागून मधुराणीचा आवाज आला.
गणेशराव ब्रेक लागल्यागत थांबले. त्यांच ह्रदय धडधडायला लागलं.
काय करावं?...
ते परत वळून मधुराणीच्या खोलीजवळ आले. दार अजूनही थोडसं तिरकं उघडं होतं. ते ढकलून गणेशराव आत गेले. त्यांच त्यांनाच आश्चर्य वाटलं.
वेळ आल्यास आपण एवढं हिमतीनेही वागू शकतो ...
" मी ... आहे" गणेशराव दबकतच आत जात म्हणाले.
मधुराणी आणि मधुकरराव आता बरेच सावरून दूरदूर बसले होते. मधुकरराव त्याच्या हातातला कागद वाचण्याचा प्रयत्न करीत आपले हावभाव लपवीत होता तर मधुराणीने आपल्या चेहऱ्यावर पुन्हा तेच नटखट नजर आणि गोड हास्य धारण केले होते.
" काय .. काही विसरला?" ती निरागसतेने म्हणाली.
मधुराणी कदाचित गणेशरावच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करु लागली.
गणेशराव आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपविण्याच्या प्रयत्नात म्हणाले," ते माझ्या मुलाच्या नोकरीचं सांगायचं राहूनच गेलं"
" अच्छा या... बसा ... " तिने गणेशरावांना बसायला खुणावत म्हटले.
तिने तिच्या बाजूला बसलेल्या मधुकरावकडे बघितले. त्यांच्यात काय घेवाणदेवाण झाली कोणास ठावूक पण मधुकरराव उठला आणि तिथून निघून गेला.
मधुराणी सोफ्यावर अजूनच रेलून बसली.
" गणेश ... असे इकडे येऊन बसा ..." मधुराणीने गणेशला तिच्या जवळ सोफ्यावर येऊन बसण्यास सांगितले.
गणेशराव स्वयंचलित खेळ्ण्यासारखे उठले आणि तिच्या शेजारी जितकं शक्य होईल तेवढ अंतर राखून बसले.
" आजकाल पहिल्यासारखं नाही राहालं... आता तब्येत साथ देईनाशी झाली" मधुराणी म्हणाली.
गणेशराव काहीच बोलले नाही.
" बघ बरं माझी नाडी बघ बरं... " तिने हात त्यांच्यासमोर धरीत म्हटले, " आजकाल बिपीचा त्रास होतोय मला"
गणेशरावने थरथरत्या हाताने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिची नाडी तपासू लागले. मधुराणीचा हात अजूनही तेवढाच मुलायम होता. ते तिच्या हाताचा स्पर्श अजूनही विसरलेले नव्हते.
" काय शिकलेला आहे तुमचा पोरगा..."
" कॉमर्स झाला आहे"
" एकच पोरगा"
" हो ... "
" एकच पोरगा... चांगलं आहे... मला तर माहितच नव्हतं..."
गणेशराव नाडीचे ठोके मोजण्याचा प्रयत्न करीत होते पण मधे मधे मधुराणी बोलत असल्यामुळे त्यांना पुन्हा सुरवात करावी लागे.
" पोराचा कुठं फार्म भरला का?"
" हो नगरपालीकेत एक जागा आहे... लिपीकाची... तिथं भरला आहे..."
" त्याचं नाव, कोणत्या पोस्टसाठी भरला आहे ती सगळी माहिती एका कागदावर लिहून द्या" मधुराणीने आपला गणेशरावच्या हातातला हात काढून घेत म्हटले.
" हो मी आणलं आहे सगळं लिहून ... " गणेशराव खिशातला कागद काढत म्हणाले.
" माझ्या सेक्रेटरीजवळ द्या" मधुराणी फोनजवळ जात म्हणाली.
गणेशराव जाण्याची परवानगी घेण्यासाठी उठून उभे राहाले.
मधुराणी एक बटन दाबून फोनमध्ये बोलली " नारायणरावला फोन लावून द्या"
तिने पुन्हा फोन क्रेडलवर ठेवला.
" बरं येतो मग... " गणेशराव म्हणाले.
मधुराणी गणेशरावजवळ जात त्यांचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, " येत जा ... असंच अधून मधून... तेवढाच मागच्या आठवणींना उजळा ... "
" हो .. हो ... " गणेशराव कसाबसे बोलले.
"माणूस जसा जसा पुढे जातो तसं तसं त्याला मागच्या गोष्टींचं महत्व पटते ... पण काही करता येत नाही.... त्या गोष्टी आता त्याला सोडून गेलेल्या असतात... अश्या वेळी मग आठवणीच माणसाच्या साथीदार असतात..." मधुराणी एकदम फिलॉसॉफिकल झाल्यासारखी बोलत होती.
तिने गणेशरावचा हात सोडला. गणेशराव वळून दरवाजाकडे चालू लागले. ती गणेशरावांना दरवाजापर्यंत सोडायला आली.
" बराय..." गणेशराव दरवाजातून बाहेर जाता जाता तिच्याकडे पाहून हसत म्हणाले.
ती नुसती मान हलवून हसली आणि दरवाजा बंद झाला.
क्रमश:...This Novel in English

Next Chapter Previous Chapter

8 comments:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network