Marathmoli katha - Madhurani - CH-46 बेचैनी

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Marathmoli katha - Madhurani - CH-46 बेचैनी

आधीचे दोन दिवस रात्री गणेशला बिलकुल झोप आली नव्हती. सोमवारची रात्रसुध्दा अशीच बेचैन अवस्थेत न झोपता नुसती कड बदलविण्यात निघून गेली.
आता तर हे प्रकरण संपलं...
जास्त फसण्याच्या आधीच आपल्याला मधुराणीच्या चारीत्र्याची जाणीव झाली....
चारीत्र्याची म्हणजे स्वभावाची...
त्यातल्या त्यात सौम्य शब्द तो शोधत होता.
आता तर आपल्याला मोकळं मोकळं वाटायला पाहिजे...
मधुराणीच्या जाळ्यातून सुटल्याची मुक्तता आपल्याला जाणवायला पाहिजे...
मग ही बेचैनी कशाची...
गणेशला काही कोडे उलगडत नव्हते...
सकाळी उठून अंघोळ वैगेरे केली. तीन दिवसांची वाढलेली दाढी करून घेतली. बॅगमधून धूतलेले इस्त्रीचे कपडे काढले. गणेशला कशातच उत्साह वाटत नव्हता.
कपडे चढवून रात्रीच भरुन ठेवलेली बॅग काढली. सारजाबाईला कालच सांगितले होते. त्यामुळे आज पुन्हा सांगण्याचा प्रश्नच नव्हता. बॅग घेऊन तो बाहेर पडला. बाहेरुन दाराला कुलूप लावले. कुलूप लावतांना त्याने मनाशी पक्के ठरविले
आता मधुराणीच्या दुकानाकडे लक्ष न देता सरळ बस स्टॉपवर जायचे...
वाटू दे तिला काय वाटणार आहे ते...
एवढ आपल्याला फसविल्यानंतर आपण तरी तिच्या मनाची काय परवा करावी...
कुलूप लावून तो वळला आणि पायात काही बळ नसल्याप्रमाणे क्षीण पावलांनी चालू लागला. पण हे काय तो आपसूकच मधुराणीच्या दुकानाकडे चालू लागला होता.
" काय गणेशराव दोन तीन दिस झाले दिसलेच नाय" मधुराणी त्याला दुकानाकडे येत असलेलं पाहून म्हणाली.
" काय बिमार पडला होता की काय?"
" हो जरा तब्येत बरी नव्हती..."
" मंग काय हे बॅग घेऊन तालूक्याला चालला की काय"
गणेशला एक गोष्ट आता लक्षात आली होती की इने आपल्या बायकोबद्दल कधीच आपल्याशी एक शब्दसुद्धा विचारला नव्हता. की कधी थट्टा केली होती.
" हो जरा जाऊन यावं म्हणतो..."
" हे मात्र बरं झालं .. आमचंही बरंच सामान संपलं अन् तुमी पण तालूक्याला चालला..."
गणेश काहीच बोलला नाही.
" हे घ्या लिस्ट मी विलासकडून लिहून घेतली हाय बगा... म्हटलं लिहायचाबी तरास तुमाला का द्यावा" तिने ती लिस्ट त्याच्या पुढ्यात धरली.
त्याने आपसूकच ती लिस्ट घेऊन आपल्या खिशात ठेवली आणि जाण्यासाठी वळला.
" आवो हे काय... सामान कसं आणाल ... हा बारदाणाबी घ्या की..." मधुराणीने थैली ज्यात पोते टाकले होते ते गणेशच्या समोर धरले.
गणेशने ती थैली आपल्या हातात घेतली. त्याने ती थैली आपल्या हातात घेताच मधुराणीने आपल्या हाताचा मुलायम स्पर्श त्याच्या हाताला केला.
गणेशचे रोमांच रोमांच फुलून गेले.
हाच ...हाच तो स्पर्श...
त्याचे अवसान जे गळून गेलं होतं ते नाहीसं झालं. त्याच्या अंगात एक नवी स्फूर्ती संचारली.
त्यानेही दुसरा हात लावण्याचं निमित्त करून तिच्या हाताला स्पर्श केला. त्याने तिच्या डोळ्यात पाहिले.
तीच नटखट नजर...
तेच गोड हास्य...
त्याचा सगळा शीण दूर झाला. तो मोठ्या उत्साहाने ती थैली घेऊन बस स्टॉपकडे जाऊ लागला. गल्लीत वळण्याच्या आधी त्याने एकदा वळून मधुराणीकडे बघितले. ती अजूनही त्याच्याकडे पाहून हसत होती.
तो गलीत वळला आणि मोठे मोठे पावलं टाकीत बस स्टॉपकडे निघाला. त्याला आता जाणीव झाली होती की आता मधुराणीच्या कामगारमाश्यांच्या कळपात अजून एक कामगार माशी सामील झाली होती....
क्रमश:...


This Novel in English

Next Chapter Previous Chapter

1 comment:

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network