Fiction Literature - Novel - Mrigajal - Ch-34

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Today's Quotes -
I don't know why they call it heartbreak.It feels like every other part of my body is broken too.
... Missy Altijd
A heartbreak is a blessing from God.It's just his way of letting you realize he saved you from the wrong one.
... Author Unknown
In the arithmetic of love, one plus one equals everything, and two minus one equals nothing.
... Mignon McLaughlin

प्रिया विजयच्या घरुन बाहेर पडली, पण समाधानी होवून नक्कीच नाही. विजयने तिला जे काही सांगीतले, ते तिला समजले होते, विजयने तसे ते अगदी 'कन्व्हीन्स' करुन सांगितले होते. तशी त्याच्या 'कन्व्हीन्सींग' पावरबद्दल ती आधीपासूनच जाणून होती. तिला पोस्ट ग्रॅजूएट करण्यास त्यानेच 'कन्व्हीन्स' करुन भाग पाडले होते. हे ते अजून विसरली नव्हती. पण आज प्रथमच तिला त्याने सांगितलेले पुर्णपणे पटलेले नव्हते. कुठेतरी तिला ते खटकल्याप्रमाणे जाणवत होते. त्याला जास्त खोदून विचारणेही तिला योग्य वाटत नव्हते. तसा तिने प्रयत्न केलाही. पण तो छोट्या छोट्या गोष्टीवर चिडत होता.

की तो तिच्यापासून काही लपवित होता...

तशी ती त्याला पुर्णपणे ओळखत होती. तो शक्यतो तिच्यापासून काही लपवित नसे.

पण न जाणो काही न सांगण्यासारखे असेल...

की जे तो तिच्यापासून लपवित असावा...

तसा आज त्यांच्यातला बॉंडही जो बऱ्याच दिवसांपासून - नव्हे बऱ्याच वर्षापासून मजबूत होता तो तिला आज प्रथमच कमकुवत झाल्यासारखा जाणवला. कारण कदाचित तो खुलून तिला सर्व काही सांगत नव्हता. किंवा ती
त्याला पुर्णपणे समजण्यात आज असमर्थ वाटत होती.

तो नयनाच्या प्रेमात पडला म्हटल्यावर ते साहजिकच होते म्हणा...

पण त्यांच्या प्रेमाला आज तिला वेगळेच वळण लागतांना दिसत होते. पण पुर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हते. म्हणून विजयच्या घरुन बाहेर पडल्याबरोबर तिने ठरवले की आता सरळ नयनाच्या घरी जायचे. पण नंतर एक क्षण ती थबकली.

आपण नयनाच्या घरी जात आहोत हे योग्य आहे का?...

आणि तेही विजयला माहित नसतांना ...

त्याला विचारले तर तो नक्कीच तिला जावू देणार नव्हता...

किंवा त्याने जावू दिले असतेही. पण तिचीच त्याला विचारण्याची हिम्मत होत नव्हती. आणि आता त्याच्या घराच्या बाहेर पडल्यावर तिच्या डोक्यात नयनाला भेटण्याचा विचार आला होता. त्यामुळे पुन्हा जावून त्याला विचारणे तिला योग्य वाटले नाही.

पण आपण तिथे जावून करणार तरी काय आहोत?...

आपल्याला तिचा स्वभाव माहित नाही की काही नाही...

आणि तिला विचारलेले ती आपल्याला सरळ सांगेल?...

पण विजय जिच्या प्रमात पडला ती तशी नसावी अशी तिला शाश्वती होती.

पण तसे म्हणावे तर विजयला अशा प्रसंगानंतर ती भेटणेही टाळू तरी कसे शकते..

तिथे गेल्याशिवाय या सगळ्या गोष्टीचा अंदाज येणार नव्हता.

पण आपल्या जाण्याने काय परिस्थिती बदलणार आहे का?...

कदाचित तिला भेटल्याने आपल्याला परिस्थितीचा अचूक अंदाज तरी येईल...

पण परिस्थिती जाणून घेण्याच्या नादात आपल्यामुळे त्यांच्यामधे अजून काही गैरसमज निर्माण झाला तर?...

विजय आणि माझ्याबद्दल तिला काही गैरसमज तर होणार नाही?...

त्यांच नातं तूटण्यास आपण कारणीभूत तर होणार नाहीना?...

नाना प्रकारचे विचार तिच्या मनात येत होते.
नयना बद्दल तिने विजयच्या तोंडून बरेच ऐकले होते. पण आत्तापर्यंत तिने नयनाला प्रत्यक्ष पाहाले नव्हते.

कदाचित तिला पाहण्याची इर्षायूक्त इच्छा तर आपल्याला तिच्याकडे जाण्यास भाग पाडत नसावी...

तिने स्वत:ची प्रबळ इच्छा पाहता स्वत:ला पडताळून बघितले.

नाही नाही...

आता सगळ्या गोष्टी कशा इर्षा वाटण्याच्या पलिकडे गेल्या होत्या.

पण नाही ... आपल्या मित्राच्या प्रती एक कर्तव्य म्हणून प्रियाला तिची भेट घेणं आवश्यक आहे...

हो बरोबर आहे... विजयमुळेच आपण तिला भेटण्यास प्रवृत्त झालो आहोत...

म्हणजे अजुनही विजयबद्दलची प्रेमाची भावना आपल्यात शिल्लक आहे...

हो बरोबर... कदाचित ती भावना आपण कधीही मिटवू शकणार नाही...

तिला जाणवले होते.

पण अश्याने तर ती भावना पुन्हा उचंबळून तर येणार नाही...

त्या भावनेला आपण आता उगीच खतपाणी तर घालत नाही आहोत?...

आणि ती पुन्हा जावे की न जावे या विवंचनेत पडली.

नाही ... आपण आपल्या पहिल्या विचाराचंच समर्थन करायल हवं...

नंतरचे विचार नेहमी गोंधळून टाकणारे असतात... आणि नंतरचे विचार हे अतिविचाराचा परिणाम असतात...

आणि अतिविचार म्हणजेच अविचार...

त्यामुळे आपल्याला गेलच पाहिजे...

तिने मनाचा पक्का निश्चय केला आणि तिचे थबकलेले पाय आता जोरात चालू लागले होते.

विजयने नयनाबद्दल आधीच प्रियाला एवढे काही सांगितले होते की तिला तिचा पत्ता वगैरे कुणाला विचारायची गरजच नव्हती उरली. विजयच्या घरापासून थोडं अंतर चालत आल्यानंतर तिने चौकात ऍटो केला आणि ऍटोवाल्याला सरळ नयनाच्या घराकडे ऍटो घेण्यास सांगितले.

प्रिया नयनाच्या बंगल्यासमोर ऍटोतून खाली उतरली. त्या भव्य दिव्य बंगल्याकडे अचंबेने पाहतच तिने ऍटोवाल्याच्या पैसे दिले. तिने बाहेरुनच आत बंगल्याच्या आवारात न्याहाळून बघितले. सगळं कसं निटनेटकं दिसत होतं. बंगल्यासमोर हिरवीगार लॉन - अगदी व्यवस्थित कटींग केलेली. आणि आवारात सगळीकडे शोची, कुठे फुलांची झाडं दिसत होती. सगळ्यांची कशी अगदी व्यवस्थित कटींग केलेली. त्या सगळ्या गोष्टीवरुन न जानो का? पण प्रियाच्या डोळ्यासमोर नयनाच्या वडिलांची एक प्रतिमा तयार झाली होती--- अगदी भावनाविरहित... यंत्रमाणवाप्रमाणे ... गंभिर व्यक्तीमत्व.
बंगल्याला न्याहाळून पाहता पाहता अचानक तिला आठवले की विजयने जेव्हा नयनाच्या घरी फोन करुन तिला भेटण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा ती बाहेरगावी गेल्याचं सांगण्यात आलं होतं.

ती गावावरुन परत आली असेल का?...

तिच्या मनात प्रश्न डोकावला.

पण त्याने फोन केल्याला एव्हाना सात - आठ दिवस तरी झाले असतील...

म्हणजे ती परत आली असेल...

किंवा ती बाहेर गावी वैगेर कुठे गेलीच नसेल फक्त विजयला तसे सांगण्यात आले असेल...

ते काहीही असो... आता आपण इथपर्यंत आलोच आहोत तर ती घरी आहे की नाही हे बघायलाच हवं...

प्रिया जेव्हा बंगल्याच्या आवाराच्या फाटकाजवळ गेली. तिथे तिला एक चौकीदार तैनातीत असलेला दिसला.

'' कुणाला भेटायचे आहे?'' चौकीदाराने तिला हटकले.

'' नयनाला..'' प्रिया.

'' काय काम?'' चौकीदार.

प्रियाला माहित होते की या चौकीदार लोकांना जास्त मान दिला तर ते जास्त वरचढ होतात. त्यांच्याशी तुसडेपणाणे वागलं तर ते अगदी सुतासारखे सरळ होतात.
तेही बिचारे काय करणार... सवयच ती ... मालकाकडून तुसडेपणाचे शब्द ऐकण्याची सवयच...

'' काम?.... पर्सनल काम आहे ... ते मी तुम्हाला सांगू शकणार नाही '' प्रिया ठामपणे त्याला जास्त भाव न देता म्हणाली.

आतामात्र चौकीदार वचकला आणि त्याने एकदा तिला न्याहाळून बघितले आणि पुढे अदबीने विचारले, '' बरं आपलं नाव?''

'' प्रिया ... '' प्रिया म्हणाली.

चौकीदाराने लागलीच तिथे ठेवलेल्या इंटरकॉमवर दोन बटनं दाबली आणि तो क्रेडल कानाशी लावून प्रतिक्षा करु लागला.

'' मॅडम ... आपल्याला कुणी प्रिया मॅडम भेटायला आलेल्या आहेत...'' चौकीदार फोनवर बोलला.

चौकीदाराने थोडावेळ तिकडचे बोलणे ऐकले आणि त्याने फोन कानावर ठेवूनच विचारले, '' प्रिया कोण? ... म्हणजे आपलं आडनाव मॅडम!''

'' विजयची मैत्रिण म्हणून सांगा '' प्रिया म्हणाली.

चौकीदाराने काही वेळ प्रियाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहाले आणि फोनमधे बोलला, '' मॅडम कुणी विजयची मैत्रीण आहे म्हणतात त्या ''

काही वेळाने चौकीदाराने गंभिरपणे फोन खाली ठेवला आणि गंभीरतेनेच प्रियास फाटकातून आत घेतले. आत जातांना प्रियाला जाणवत होतेकी चौकीदारासही कदाचित विजयबद्दल माहित होते. किंवा त्याला विजयबद्दल काही सुचना देवून ठेवण्यात आल्या असाव्यात. कारण विजयचं नाव काढताच अचानक त्याचा गंभीर झालेला चेहरा आणि जड झालेल्या त्याच्या हालचाली तिच्या नजरेतून सुटल्या नव्हत्या.

क्रमश:...

Today's Quotes -
I don't know why they call it heartbreak.It feels like every other part of my body is broken too.
... Missy Altijd
A heartbreak is a blessing from God.It's just his way of letting you realize he saved you from the wrong one.
... Author Unknown
In the arithmetic of love, one plus one equals everything, and two minus one equals nothing.
... Mignon McLaughlin 

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network