Psycological thriller - Novel Mrugajal - Ch - 40

Next Chapter Previous Chapter

This Novel in English


Today's Quotes:
You can clutch the past so tightly to your chest that it leaves your arms too full to embrace the present.
... Jan Glidewell
There are things that we don't want to happen but have to accept, things we don't want to know but have to learn, and people we can't live without but have to let go.
... Author Unknown

दर दोन तिन दिवस आड असे तिनदा-चारदा भेटून प्रिया आणि राजेश विजयच्या आईजवळ विजयच्या ट्रिटमेंटबद्दल आग्रह करु लागले. त्यांनी त्या गोष्टीचा जणू पिछाच पुरवला. तेव्हा कुठे हळू हळू विजयच्या आईला विजयच्या ट्रिटमेंटचं महत्व पटून ती त्यांना सहकार्य करायला तयार झाली. खरंतर तिला त्या धक्यातून सावरायला थोडा वेळ हवा होता. आणि ती दोघं तिला नेहमी भेटल्यामुळे तिला तो वेळ आणि स्वत:च मन हलकं करण्यास निमित्त मिळालं होतं. आणि जेव्हा विजय पुर्णपणे बरा होवू शकतो हे पटवण्यास ते दोघे यशस्वी झाले तेव्हा तीही सहकार्य करण्यास तयार झाली. मग त्यांनी विजयच्या आईला मधे घालून विजयला कधी जबरदस्तीने तर कधी त्याला समजावून डॉक्टरकडे नेण्यास सुरवात केली. प्रथम तो काहीही बोलण्यास किंवा सहकार्य करण्यास तयार नव्हता. पण डॉक्टरांनी लगेचच काही गोळ्या लिहून देवून त्या सुरु करण्याचे सुचविले. आता त्या गोळ्या घेण्याचा जेव्हा प्रश्न उदभवला तेव्हा पुन्हा विजय काहीही सहकार्य करायला तयार नव्हता. तेव्हा विजयच्या आईनेच केव्हा त्याला रागावून तर केव्हा त्याच्या लपून त्याच्या चहात किंवा जेवणात मिसळवून त्याला गोळ्या देण्यास सुरवात केली.

कसे का होईना औषध सुरु होणे महत्वाचे होते. आणि औषध सुरु होताच औषधाने आपला परिणाम दाखवणे सुरु केले. ट्रिटमेंट सुरु झाल्या पासून त्याचा ऍग्रेसिव्ह पणा आणि साध्या साध्या गोष्टीवर चिडण्याचे त्याचे प्रमाण कमी होत होते. मेडीकल भाषेत सांगायचे झाल्यास त्याचा व्हायलंटपणा जावून आता तो शांत होत होता. आजकाल तो जो आधी नेहमी वेचैन असायचा आता तो कधी शांतपणे एकाजागी बसून राहत असे तर कधी झोपत असे. कदाचित ट्रिटमेंटमुळे त्याला जास्त सुस्ती येवून जडपणा येत असावा. एक दिवस असाच घरात तो विचारमग्न बसला असतांना राजेश आला आणि त्याच्या हाती एक पाकिट देवून परत जावू लागला.

'' अरे काय आहे?'' विजयने त्याला आवाज देल्यागत विचारले.

'' तुच उघडून बघ'' राजेश म्हणला आणि निघून सुध्दा गेला.

कदाचित त्याला त्याच्याशी होणारा त्याचा वाद टाळायचा असावा. कारण आजकाल राजेश जरी त्याच्या घरी अधून मधून येत असे, पण तो विजयशी बोलण्याचे कटाक्षाने टाळत असे. कारण त्यांच्या बोलण्याचा अंत शेवटी त्यांच्या वादविवादातच होत असे. आणि आज तर जणू राजेशला त्यांच्या वादविवादाची खात्रीच असावी असा तो त्याच्या हातात पाकिट देवून तेथून लागलीच निघून गेला. विजयने एकदा दाराकडे बघितले, ज्यातून आत्ताच राजेश निघून गेला होता आणि मग पाकिटाकडे बघितले.

असं काय असावं या पाकिटात?...

त्याने विचार केला.

न जानो कॉलेज संपल्यावर भरलेल्या नोकरीच्या अप्लीकेशनचा एखादा कॉल असावा...

पण कॉल याच्याजवळ कसा काय पोहोचला?...

किंवा यानेच कुठेतरी खटपट करुन आपल्या नोकरीची व्यवस्था लावली असावी...

किंवा प्रियाने हे याच्याजवळ दिले असणार...

कारण नाहीतरी आपण तिच्याशी आजकाल बोलत नाही आहोत...

त्याने संथपणे ते पाकिट उलटून पुलटून बघितलं.आणि मग पाकिट फोडून आत बघितलं. आत लग्नाची पत्रिका होती.

कुणाच्या लग्नाची पत्रीका असावी?...

नाना प्रकारच्या शंका त्याच्या डोक्यात घर करु पाहत होत्या. त्याने थोडाही वेळ न दवडता ती पत्रीका बाहेर काढली आणि वाचायला लागला सुध्दा. तेवढ्यात विजयची आई तिथे आली.

'' कुणाच्या लग्नाची पत्रीका आहे?'' विजयच्या आईने विचारले.

विजयने काही न बोलता पत्रिका आपल्या आईच्या समोर धरली.

'' कुणाची आहे ... जरा वाचून दाखव की? '' विजयची आई म्हणाली.

विजय आपला पडलेला चेहरा लपवित खाली मान घालून म्हणाला, '' नयनाच्या लग्नाची आहे''

'' मी आधीपासूनच सांगत होते... आता शिक काहीतरी... त्या पोरीचं भूत काढून टाक डोक्यातून... ते लोक कुठे अन आपण कुठे... आपण कसं आपल्या पायरीनं वागावं... ही सोन्यासारखी पोरगी सोडून त्या अवदसेच्या मागे लागलास... काय दिसलं त्या सटवीत देव जाणे... ही पोरगी पहा किती जीव लावते... एखादी असती तर गेली असती वाऱ्यावर सोडून... नाही म्हटलं तरी एका पागलाची साथ कोण देणार?'' विजयच्या आईच्या तोंडून रागाच्या भरात निघून गेले.

आधीच विजय दु:खी झाला होता आणि आता त्याची आई त्याला बोलू लागल्यावर त्याच्याच्याने राहवले गेले नाही.

'' आई... मी पागल नाही आहे... मला तू तरी पागल म्हणू नकोस...'' विजयच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

त्याच्या डोळ्यातले अश्रु बघून त्याच्या आईला जणू जाणीव झाली होती की ती जरा जास्तच बोलली होती.

ती जवळ गेली आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवीत म्हणाली, '' पोरा... सत्य हे कडू असते... म्हणून सत्यापासून पाठ फिरवायची नसते... बघ काय हाल करुन घेतलेस तू जीवाचे... तुझा बाप तसा... चोविस तास दारुच्या नशेत पडून असतो... तुझी बहिण तशी.. अन तू ही असा करु लागल्यवर कोणाकडं पहायचं मी '' विजयच्या आईचाही गळा दाटून आला होता.

आज विजय आपल्या आईच्या खांद्यावर डोकं ठेवून कितीतरी दिवसानंतर प्रथमच ओक्साबोक्शी रडायला लागला होता. त्याला आठवत होतं एकदा असाच तो सहावीत असतांना त्याच्या वडीलांनी त्याला दारु पिऊन काहीही कारण नसतांना बदडून काढलं होतं. तेव्हाही तो असाच आइच्या कुशीत शिरुन ओक्साबोक्शी रडला होता. विजय कितीतरी वेळ असाच आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होता. त्याची आई एखाद्या लहान बाळासारखी त्याला जवळ घेवून त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत होती. आणि तिच्याही डोळ्यातून अश्रूचा अखंड पूर वाहत होता.

तिला आठवत होतं... की विजयचा जन्म झाला होता आणि तेव्हापासूनच तिच्या नरक यातना संपल्या होत्या...

तिचं लग्न होवून तिला पहिली मुलगी झाली... पण तिच्या सासूला मुलगा हवा होता... म्हणून तिच्या सासूने तिचा अगदी अतोनात छळ सुरु केला होता... जणूकाही तिचा छळ केल्याने तिला मुलगा होणार होता... तिला कमीत कमी नवऱ्याकडून तरी आधाराची अपेक्षा होती ... पण नवरा जरी सुरवातीला पित वैगेरे नसला तरी तिच्याशी फार तुटक तुटक वागत असे.. तो जास्तीत जास्त घराच्या बाहेरच आपला वेळ घालवत असे... आणि मग तिला दुसऱ्यांदा दिवस राहाले... नवऱ्याला तर जणू तिला दिवस राहाले नाही राहाले याचं काही सोयर सुतक नव्हतं... पण ती बातमी कळल्यापासून तिच्या मनावरचं दडपण अधिकच वाढलं... दुसऱ्यांदाही जर मुलगी झाली तर?... आणि मग ज्या दिवशी विजयने त्या घरात पाऊल ठेवले... अगदी त्या दिवसापासून... नव्हे अगदी त्या क्षणापासून तिच्या नरक यातना संपल्या... घरात मुलाचा जन्म झाला हे कळताच घराचा तर नूरच बदलून गेला... सासूही तिच्यासोबत एवढी प्रेमाने वागू लागली की तिला कधी कधी शंका यायची की ती हीच सासू का जी तिला आधी छ्ळ छ्ळ छळायची...

दारात चाहूल लागताच विजयची आई भानावर आली.

'' जा आता तोंड वैगेरे धूवून घे... मी बघते समोर कोण आलं ते?'' अशी म्हणत विजयची आई समोर गेली.
विजय आपले डोळे पुसत मागे बाथरुमकडे गेला. विजयला प्रथमच आज मोकळं मोकळं वाटत होतं. इतके दिवस जणू त्याच्या जिवाची अक्षरश: घूसमट चाललेली होती. आणि आज त्याला अगदी पहिल्यासारखं वाटत होतं.

म्हणजे माझ्यात खरंच काहीतरी फरक पडलाय...

आधीचा विजय असा अगतिक असा.. हरणारा नव्हता..

आणि हरुन असा रडणारा तर नक्कीच नव्हता..

मग माझ्यात खरंच काय बदल झाला आहे..

हो खरंच एखाद्या न सुटणाऱ्या कोड्यात कायमचं अडकुन पडल्यासारखं वाटतय तर खरं...

म्हणजे...बदल झाला आहे हे तर मला मान्य करावच लागेल...

आणि मग जर बद्ल झाला असेल... जर तो पुर्वीचा मी ... मी राहोलो नसेल ... तर आता ज्या कोड्यात मी अडकलो आहे... त्यातून मला बाहेर निघायला हवं... बाहेर निघायलाच हवं.... आणि हो अगदी कायमचं...

त्याने जणू मनाशी अगदी पक्का निश्चय केला होता.

क्रमश:

Today's Quotes:
You can clutch the past so tightly to your chest that it leaves your arms too full to embrace the present.
... Jan Glidewell
There are things that we don't want to happen but have to accept, things we don't want to know but have to learn, and people we can't live without but have to let go.
... Author Unknown

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment

 RSS Feed

आपण या संकेतस्थळावर येणारे

वे आगंतूक आहात!

Marathi Subscribers

English Subscribers

Hindi Subscribers

Enter your email address to SUBSCRIBE the MARATHI NOVELS:

Social Network